लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नांदेड शहराच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून चार दावेदार पुढे आले असून उपमहापौरपदासाठी तिघांनी अर्ज नेले आहेत. शहराचे महापौर आणि उपमहापौर शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित होणार आहेत.महापौरपदासाठी अर्ज घेण्याचा गुरुवार शेवटचा दिवस होता. गुरुवारी दुपारी काँग्रेसकडून ज्योती रायबोले, शीला भवरे, दीक्षा धबाले आणि ज्योती कदम यांनी महापौरपदाचे अर्ज घेतले. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून विनय पाटील गिरडे, प्रशांत तिडके, सतीश देशमुख यांनी अर्ज घेतले आहेत. भाजपाकडूनही उपमहापौरपदासाठी गुरुप्रितकौर सोडी यांनी अर्ज घेतला आहे. गुरुवारी काँग्रेसकडून अर्ज घेताना शहर महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी अर्ज घेतले. त्यामुळे काँग्रेसकडून महापौरपदासाठी आजघडीला तरी चार उमेदवार आणि उपमहापौरपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आले आहेत. शुक्रवारी दुपारी काँग्रेसकडून कोणाला अर्ज भरण्याचे आदेश दिले जातात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून महापौरपदासाठी अर्ज भरता येणार आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे काँग्रे्रसकडून महापौरपदासाठी कोण अर्ज भरते, याकडे लक्ष लागले आहे.महापालिकेत काँग्रेसला एकतर्फी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपद हे काँग्रेसलाच मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे दुपारी तीन वाजताच काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करणारे महापौर आणि उपमहापौर निश्चितपणे होणार आहेत. त्यामुळे शहराच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिल्या महापौर या दुपारी तीन वाजता निश्चित होणार आहेत. महापौरपदासाठी काँग्रेसकडून ज्योती सुभाष रायबोले आणि शीला किशोर भवरे या दोन प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. दुसरीकडे दीक्षा धबाले आणि ज्योती कदम यांनाही काँग्रेसने अर्ज घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळी महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पहावे लागणार आहे. दुसरीकडे उपमहापौरपदासाठीही काँग्रेसकडून विनय पाटील गिरडे, प्रशांत तिडके आणि सतीश देशमुख यांनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे उपमहापौरपदाचा दावेदारही सद्य:स्थितीत काँग्रेसने गूलदस्त्यातच ठेवला आहे. विनय पाटील गिरडे यांना उपमहापौरपदाची संधी मिेळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी प्रशांत तिडके व सतीश देशमुख यांचाही उपमहापौरपदाचा दावा तगडा आहे. त्यामुळे ही उपमहापौरपदाची उत्सुकता शुक्रवारी निकाली निघणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही हे भाजपा उमेदवारांनी घेतलेल्या दोन अर्जावरुन स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होऊ देऊ नका असे आदेश पक्षाकडून आल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज घेतले आहेत.
काँग्रेसकडून चार दावेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:01 AM