औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वत्र जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात धडाक्यात कामे सुरू आहेत. परंतु तरीदेखील या योजनेचा जिल्ह्याचा तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी खर्चाअभावी परत गेला आहे. लघु सिंचन विभागाने वेळेत हा निधी खर्च न केल्यामुळे तो परत गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जलसंधारणाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाचे मंत्री, मुख्य सचिव यासह अनेक वरिष्ठ अधिकारी दररोज या योजनेच्या कामांचा आढावा घेत आहेत. सिमेंट नाला बांध, साखळी बंधारे, गाळ काढणे यासारखी जास्तीत जास्त कामे करून येणाऱ्या काळात दुष्काळमुक्ती करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही वन विभाग, कृषी विभाग, लघु सिंचन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या योजनेचा ४ कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरीस खर्चाविना परत गेला आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३१ मार्च रोजी बीडीएस सिस्टीमवरून वेळेत हा निधी न काढल्यामुळे मुदत संपून तो निधी परत गेला. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने दोषी अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. निधीच्या खर्चासाठी जबाबदार असलेले लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सत्तार खान हे नुकतेच सेवानिवृत्तही झाले आहेत.
जलयुक्त शिवारचे चार कोटी रुपये गेले खर्चाविना परत
By admin | Published: May 14, 2016 11:56 PM