वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या सर्तकतेमुळे या परिसरात शुक्रवारी मध्यरात्री टाकण्याचा प्रयत्न फसला आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले असून दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहे. पोलिसांनी पकडलेल्या चौघा दरोडेखोरांच्या ताब्यातून दोन धारदार तलवारीसह दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वडगाव कोल्हाटी परिसरातील खदाणीजवळ काही इसम अंधारात दबा धरुन बसल्याची माहिती गुप्त बातमीदाराने उपनिरीक्षक राहुल रोडे यांना दिली होती. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास खदान परिसराला चोहोबाजुने वेढा घातला होता. पोलिस आल्याची चाहुल लागताच अंधारात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चौघा संशयितांना पोलिस पथकाने पाठलाग करुन पकडले.
या थरारक घटनेत दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिस पथकाने पकडलेल्या या चौघा दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सतीश महेर (२० रा.पंढरपूर), विशाल लाटे (१९ रा. उकंडा ता.शिरुर-कासार, ह.मु.अयोध्यानगर), गणेश पिंपळे (२१ रा.जोगेश्वरी), सुरज राठोड (२१ रा.रांजणगाव शेणपुंजी)असल्याचे सांगत फरार झालेल्या दोघा दरोडेखोरांची नावे अनिल बन्सोडे (रा.जोगेश्वरी) व विकास केदारे (रा.रामराई ता.गंगापूर) असल्याचे पोलिसांना सांगितले.