जालना : येथील भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय ) १ कोटी २२ लाख ८१ हजार ९७८ रुपयांची अफरातफर करणाऱ्या बलवंत यशवंत देशमुख (छत्रपती नगर, सातारा परिसर औरंगाबाद) या तत्कालीन शाखाधिकाऱ्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.जालना येथे बँकेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना देशमुख याने पदाचा गैरवापर करून बँकेच्या विविध एटीएम खात्यातून १ कोटी २२ लाख ८१ हजार ९७८ रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग केले. परंतु बँकचे मुख्य प्रबंधक संग्रामकिशोर साहू यांना बँकेच्या आॅडीटमध्ये रकमेचा ताळमेळ लागत नव्हता. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता देशमुख याने संबंधित रकमेचा अपहार केल्याचे बँकेच्या मुख्य प्रबंधक यांच्या लक्षात आले. आरोपी देशमुख कार्यरत असलेल्या बँक शाखेच्या आॅडीटची तपासणी करण्यात आली असता जालना शहरातील बँकेच्या शाखेतही अपहार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुख्य प्रबंधक साहू यांनी सदर बाजार पोलिस ठाणे गाठून देशमुख याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. देशमुख याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.देशमुख हे शाखाधिकारी म्हणून जालना येथे ८ एप्रिल २०१३ ते ८ जून २०१५ या दरम्यान कार्यरत होते. परंतु देशमुख हे औरंगाबाद येथील क्रांतीचौकात असणाऱ्या मुख्य शाखेत ८ मे ते १४ डिसेंबर २०१३ या वर्षात कार्यरत असताना आॅडीटदरम्यान ७१ लाख ५१ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले होते. त्यानंतर जालना येथेही चौकशी केली असता येथेही आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. (प्रतिनिधी)
‘त्या’ शाखाधिकाऱ्यास चार दिवसांची पोलिस कोठडी
By admin | Published: August 26, 2016 12:19 AM