हिंगोली : जिल्ह्यात ‘सुपर पॉवर इनव्हेस्टमेंट सेव्हिंग इंडिया प्रा.लि. कंपनी’ च्या नावे दुप्प्पट-तिप्पट रकमेचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी दीड महिन्यांपूर्वी सहा जणांवर गुन्हा दाखल झालेला आहेत. यातील दोन मुख्य आरोपींना औरंगाबाद पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणात आॅगस्ट महिन्यात विश्वनाथ लोंढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश रामभाऊ शिंदे (रा. लाख), दीपक केडू पारखे, दिव्या दीपक पारखे (कंपनी संचालक दोघे रा. औरंगाबाद), विश्वनाथ बोचरे (रा. खरबी), संपत केदारलिंग वसू (रा. इंचा), नामदेव तुकाराम कऱ्हाळे (रा. डिग्रस कऱ्हाळे) यांच्याविरूद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुपर पॉवर इनव्हेस्टमेंट सेव्हिंग इंडिया प्रा. लि. चे संचालक असलेले दीपक पारखे, दिव्या पारखे यांना औरंगाबाद येथे यापूर्वीच अटक झालेली आहे. त्यानंतर एजंट प्रकाश शिंदे, विश्वनाथ बोचरे, संपत वसू, नामदेव कऱ्हाळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. त्यांनी मागील २ वर्षांपासून ‘सुपर पॉवर’ कंपनीमध्ये आकर्षक योजनांचे आमिष दाखवून अनेकांना आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी विविध बनावट योजना सांगून त्यांना दुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून भरमसाठ पैसे गुंतवण्यास सांगितले. ही रक्कम जमा करून कंपनीचे बनावट व्हाऊचर व बँकेचे खोटे धनादेश देऊन लाखो रूपयांचंी फसवणूक केल्याचे समोर आले. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी मुख्य आरोपी दीपक केडू पारखे, दिव्या दीपक पारखे या दोघांना सोमवारी बासंबा पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर आड करीत आहेत. (प्रतिनिधी)
चार दिवसांची पोलिस कोठडी
By admin | Published: September 09, 2014 11:49 PM