औरंगाबाद : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर के ले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
उमेश श्रीराम परदेशी (४०,रा. पुंडलिकनगर, गारखेडा), गणेश सुरेश सावंत (१९, रा. आनंदनगर, लातूर), संदीप गंगाराम मेटकर (२७, रा. चिखलवाडी, नांदेड) आणि रोहिदास माधू राऊत (१९, रा. चिंचवळ, नाशिक), अशी अटक के लेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन ब्लेड, कटर, काठी, मिरचीपूड, चाकू आणि चेन कटर, अशी हत्यारे जप्त के ली आहेत.
यासंदर्भात नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे शिपाई अतिकेश मदनराव काळमेघ (३१) यांनी तक्रार दिली. सोमवारी (दि. २२) काळमेघ त्यांच्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना नांदेड रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १ जवळील शिवाजीनगर पुलाखाली रात्री ११ वाजेच्या सुमारास पाच व्यक्ती दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बसल्याचे दिसल्याने लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर छापा मारला.
पोलिसांनी चौघांना पकडले. मात्र, एक जण फरार झाला. यासंदर्भात नांदेडच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक सरकारी वकील एस.बी. वर्पे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.