गंगापूर : तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा सहकारी साखर कारखाना व जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीत दिसून येत असते. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुक्याच्या वाट्याला चार संचालक आले असून, यात कृष्णा पाटील डोणगावकर यांचे वर्चस्व दिसून आले आहे.
कृष्णा पाटील सहकारी सोसायटी मतदारसंघातून निवडून आले असून, त्यांच्या पत्नी ॲड. देवयानी या इतर मागासवर्गीय मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. १९९७ नंतर पुन्हा एकदा कृष्णा पाटील यांच्या घरात एकाच वेळी दोन संचालक निवडून आले आहेत. माजी खासदार साहेबराव पाटील हे सलग दहा वर्षे बँकेचे संचालक होते, तर कृष्णा पाटील १९९७ ते २००७ पर्यंत सलग दहा वर्षे संचालक राहिले आहेत. याचदरम्यान त्यांच्या मातोश्री इंदूताई यांनी पहिले पाच वर्षे बॅंकेच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. आता पुन्हा तीन टर्मनंतर कृष्णा पाटील व जि. प.च्या माजी अध्यक्ष ॲड. देवयानी पाटील या पती-पत्नीच्या रूपाने एकाच वेळी दोन संचालकपदे डोणगावकरांच्या घरात आली आहेत.
कृष्णा पाटील यांनी बँकेचे माजी उपाध्यक्ष व बंब गटाचे जयराम साळुंखे यांचा पराभव करून विरोधकांना धक्का दिला आहे. खुलताबाद तालुका सहकारी सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले किरण पाटील डोणगावकर यांची संचालक म्हणून काम करण्याची ही सलग पाचवी वेळ असेल. माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या पत्नी मंदाबाई माने यांनी सलग दुसऱ्यांदा निवडून येत आपले संचालकपद कायम राखले आहे. तालुक्याला एकाच वेळी चार संचालक लाभल्याने सहकार क्षेत्राकडून तालुक्याच्या आशा वाढल्या आहे.