कन्नड (औरंगाबाद): पेडकवाडी घाटातील पुलाच्या पाईपमध्ये सागर जैस्वालचा मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या ४८ तासात पोलीसांनी मारेकऱ्यांना जेरबंद केले. पंढरीनाथ परसराम वाघचौरे, काकासाहेब परसराम वाघचौरे ( दोघे राहणार धनगरवाडी, औराळा ) व दिनेश शांताराम साळुंखे ( रा. कविटखेडा तालुका कन्नड ) अशी आरोपींची नावे असून आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरीनाथ वाघचौरे व दिनेश उर्फ पप्पू साळूंखे यांनी सागर जैस्वाल याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. सागरने चारचौघात पंढरीनाथ आणि दिनेशला पैशांची मागणी केली. यामुळे दोघेही अपमानित झाले होते. यातूनच दोघांनी सागरला दि. २० नोव्हेंबर रोजी पैसे घेण्यासाठी पेडकवाडी शिवारात बोलावले. तेथे लोखंडी हातोडी व दगड डोक्यात मारून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह साडी व प्लास्टीकमध्ये गुंडाळून पेडकवाडी घाटातील म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाखालील पाईपमध्ये ठेवला. त्यापूर्वी आरोपींनी सागरच्या अंगावरील सोन्याची साखळी, हातातील अंगठ्या, कानातील बाळी काढून घेतली.
दरम्यान, दि. २१ नोव्हेंबर रोजी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात सागर जैस्वाल बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली. तपास सुरु असताना दि. १ डिसेंबर रोजी पेडकवाडीचे पोलीस पाटील आसाराम कलाल यांनी घाटातील पाईपमध्ये मृतदेह असल्याचे ग्रामीण पोलीसांना कळविले. मृतदेह सागर जैस्वालचा असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने वेगवान तपास सुरु केला. अवघ्या ४८ तासांत खुनाचा उलगडा करत पोलिसांनी पंढरीनाथ परसराम वाघचौरे, काकासाहेब परसराम वाघचौरे ( दोघे राहणार धनगरवाडी, औराळा ) व दिनेश शांताराम साळुंखे ( रा. कविटखेडा तालुका कन्नड ) अशा तीन आरोपींना जेरबंद केले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, पोहेकॉ. दिपेश नागझरे, संजय घुगे, पोना. वाल्मिक निकम, गणेश गांगवे, नरेंद्र खंदारे, उमेश बकले, पोकॉ. योगेश तरमाळे, जिवन घोलप, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. तात्याराव भालेराव, पोउपनि. सागरसिंग राजपुत, पोहेकॉ. कैलास करवंदे, बाबासाहेब धनुरे यांनी संयुक्त रित्या गोपनिय माहिती व तांत्रिक द्दष्ट्या तपास करून केली.