बीड : आरोग्य सुविधेसोबतच स्वच्छता व टापटीप बाळगणाऱ्या चार शासकीय आरोग्य संस्थांची ‘कायाकल्प’ पारितोषकासाठी निवड झाली. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे यासंदर्भात नुकतेच जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले आहे.आरोग्य केंद्रांतील अंतर्गत व परिसर स्वच्छता, जंतूसंसर्ग रोखण्यासाठी योग्य ते उपाय, स्वच्छ पाणीपुरवठा, अद्यावत शौचालय यावर काम करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकारच्या वतीने ‘कायाकल्प’अंतर्गत लाखो रुपयांची बक्षीसे दिली जातात. यावर्षी जिल्ह्यातील केज उपजिल्हा रुग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे यासाठी पात्र ठरली. उल्लेखनीय म्हणजे घाटनांदूर (ता. केज) येथील प्रा. आरोग्य केंद्रास बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे दोन लाखांचे बक्षीस मिळाले आहे. चौसाळा (ता. बीड), तलवाडा (ता. गेवराई) व किट्टीआडगाव (ता. माजलगाव) येथील प्रा. आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस जाहीर झाले आहे. केज उपजिल्हा रुग्णालयास प्रोत्साहनपर एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. विशिष्ट प्रपत्रातील १०० गुणांकरता मूल्यांकन झाले होते. ५० पैकी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची यासाठी निवड झाली ही गौरवाची बाब असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले. आगामी काळात या योजनेंतर्गत जास्तीत जास्त आरोग्य केंद्रांना बक्षीस मिळण्याच्या दृष्टीने उपाय केले जातील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘कायाकल्प’ योजनेत चमकल्या जिल्ह्यातील चार आरोग्य संस्था
By admin | Published: January 07, 2017 11:00 PM