औरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात घुसखोरी करून वाळूज एमआयडीसीमधील विविध कारखान्यांत तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या १०७ समाजकंटकांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. असे असले तरी दंगेखोरांना चिथावणी देणाऱ्या बुलेटस्वार पप्पूसह सुमारे ४०० संशयित पोलिसांना वाँटेड आहेत. ते गायब झाल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी बंद पुकारला होता. औरंगाबाद शहरात अत्यंत शांततेत बंद पार पडला. त्या दिवशी दुपारनंतर मात्र समाजकंटकांनी आंदोलनात उतरून वाळूज औद्योगिक वसाहतीत जाळपोळ, तोडफोड केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंदविण्यात आले. एमआयडीसी वाळूज आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंधरा ते वीस दिवस घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून तब्बल १०७ संशयित दंगलखोरांना अटक केली.
यातील अर्ध्याहून अधिक आरोपी कारागृहात आहेत, तर काही जणांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक साबळे म्हणाले की, जाळपोळ, दगडफेक आणि लुटालूट करणाऱ्या टोळक्यांना एका बुलेटस्वाराने चिथावणी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आम्ही तपास केला असता त्याचे नाव पप्पू असल्याचे समजले. त्याचे पूर्ण नाव कळू शकले नाही; मात्र घटनेपासून संशयित पप्पू मोटारसायकलसह पसार झालेला आहे.
दंगल पूर्वनियोजित नव्हतीही दंगल पूर्वनियोजित नव्हती, त्यामुळे याबाबतची कल्पना आधीच पोलिसांना कळू शकली नाही, असे पो.नि. साबळे म्हणाले. हा केवळ गुन्ह्यातून आनंद मिळविण्याचा प्रकार होता, असे दिसते.
दंगलीमुळे एमआयडीसीला धक्कापोलीस, अग्निशमन दलासह कंपनीतील अधिकाऱ्यांची वाहने दंगलखोरांनी जाळून टाकली. यासोबत कंपन्यांच्या काचा फोडून नुकसान केले. दंगलीमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे उत्पादन बंद ठेवावे लागले. या दंगलीमुळे वाळूज एमआयडीसी हादरली आणि अनेक उद्योगांनी पुढील विस्तार थांबविल्याचे सांगितले गेले. दंगलीचा औद्योगिक नगरीला मोठा धक्का बसला.