छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाची अंमलबजावणी होत करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्याविषयी विद्यापीठाने संलग्न ४०० महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी बुधवारी संवाद साधला. हे धोरण राबविताना प्राचार्यांसह प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा राहील, असे प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात ऑनलाईन बैठक बुधवारी झाली. प्रकुलगुरू डॉ. शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार नॅकच्या मूल्यांकनात ए, ए प्लस आणि ए प्लस प्लस ग्रेड मिळविणाऱ्या महाविद्यालयांसह स्वायत्त महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. त्याशिवाय याच वर्षी धोरण लागू करण्यासाठी इतर महाविद्यालयांना ऑप्शन देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याविषयी तयारी करावी, अशा सूचनाही प्रकुलगुरू डॉ. शिरसाठ यांनी या वेळी प्राचार्यांना दिल्या.
बैठकीत अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे आदींनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्यांनी देखील आपली मते मांडली. युनिकचे संचालक डॉ. प्रवीण यन्नावार, प्रोग्रामर दिनेश कोलते, सचिन चव्हाण, यशपाल साळवे, आशिष वडोदकर आदींनी ऑनलाइन बैठकीच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.