- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : नगर नाका ते दौलताबाद टी-पॉइंटपर्यंतचा साडेआठ किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणातून सहा पदरी करण्याचे काम रेंगाळले आहे. त्या रस्त्यासाठी २०० कोटींची मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या. परंतु, रस्त्यात येणाऱ्या झाडांसदर्भात वृक्षप्रेमींच्या तक्रारी आल्यामुळे पहिल्या निविदा रद्द केल्या. त्यामुळे प्रकरण कोर्टात गेल्याने रस्त्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
१० महिन्यांपूर्वी या रस्त्याची घोषणा झाली होती. पश्चिम मतदारसंघातील या रस्त्यास चौपदरीकरणास तत्त्वत: मान्यता मिळाली होती. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश ही तीन राज्ये व मराठवाडा, विदर्भ व खान्देश या तीन प्रांतांना जोडणाऱ्या सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणाऱ्या नगर नाका ते दौलताबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाची दोन दशकांपासून मागणी आहे. वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, शुलीभंजन तसेच म्हैसमाळ व गौताळा अभयाअरण्य, चाळीसगाव रस्त्यावरील कालीमातेचे मंदिर, खुलताबाद भद्रा मारोती मंदिर, घृष्णेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी याच रस्त्यावरून जावे लागते. अरुंद रस्त्यामुळे अपघाताची संख्या वाढल्याने रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी पुढे आली.
२०० कोटींना मिळाली मंजुरीनगर नाका ते दौलताबाद टी पाॅइंटपर्यंत २४ मीटर सिमेंट रस्त्यासह दोन्ही बाजूंना दोन मीटरचा डांबरी रस्ता, मध्यभागी दोन मीटरच्या दुभाजकावर सुशोभीकरण करण्याची तरतूद आहे. रस्ता बांधणी व भूसंपादनासह विद्युत खांब व डीपी हटविण्यासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर होऊन दहा महिने उलटले आहेत.
जुने टेंडर रद्द केलेनिविदा काढून शासनाकडे पाठविल्या. मात्र, जुन्या झाडांप्रकरणी तक्रार आल्या. त्यामुळे मुख्य अभियंत्यांनी पुन्हा पाहणी करण्यास सांगितले. ८० झाडे त्या रस्त्यात येत आहेत. त्यामुळे झाडे वाचवून डीपीआर केला. दरम्यान जुने टेंडर रद्द केले. नवीन टेंडर काढले. त्यामुळे जुना कंत्राट कोर्टात गेला.- एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता