औरंगाबाद : ट्रंपोलिन आणि टंबलिंन या खेळाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या चार मास्टरमाईंड आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
निलंबित क्रीडा अधिकारी भावराव रामदास वीर (५२), निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रेय महादवाड, पाटबंधारे विभागातील दफ्तर कारकून शंकर शामराव पतंगे आणि एजंट अंकुश प्रल्हाद राठोड (रा. पारेगाव, ता. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, आरोपी टोळीने राज्यातील विविध तरुणांना ट्रंपोलिन आणि टंबलिन या खेळाच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा सहभाग घेऊन क्रमांक मिळविल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विक्री केले होते. २५ हजार ते तीन लाख रुपये या किमतीत आरोपींनी तब्बल २६८ जणांना बनावट प्रमाणपत्र दिले होते. आरोपी पतंगे आणि राठोड हे ग्राहक शोधून आणत. त्यानंतर ते बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रस्ताव तयार करत. हा प्रस्तावानुसार आरोपी वीर बनावट प्रमाणपत्र तयार करून देत. या सर्व प्रमाणपत्राची पडताळणी आरोपी क्रीडा उपसंचालक महादवाड हा करुन देत. बोगस प्रमाणपत्र असल्याचे माहिती असूनही महादवाड ने ते खरे असल्याची पडताळणी करून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्याची माहिती मिळाल्यावर याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आणि नागपूत येथे स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. जवाहरनगर ठाण्यातील गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि त्यांचे पथक करत आहे. पथकाने तपास करून या रॅकेटच्या मास्टर माईंड असलेल्या चारही आरोपींना १९ ते २१ मार्चदरम्यान अटक केली.
चौकट
पत्ते बदलून दिले प्रमाणपत्र
आरोपी पतंगे आणि राठोड हे क्रीडा संघटनेचे पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. त्यांची ओळख महादवाड आणि वीर यांच्यासोबत होती. पतंगे आणि राठोड यांनी औरंगाबाद उपसंचालक कार्यालयाच्या क्षेत्राबाहेरील जिल्ह्यातील तरुणांना ते औरंगाबादचे रहिवासी असल्याचे दाखवून बनावट क्रीडा प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात समोर आले.