औरंगाबाद : माजी नगरसेविकेच्या मुलाला मारण्यासाठी आलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शनिवारी रात्री चार जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी तलवार, चाकू, जंबिया, दोरी आणि मिरची पावडर जप्त केली आहे.
अटक केलेल्या गुन्हेगारांत अजय राजकुमार ढगे ( सैलानीनगर,नांदेड), हितेंद्र नवनाथ वाघमारे (रमाईनगर, हर्सूल), किरण शिंदे (गजानननगर, गारखेडा परिसर), आकाश अर्जुन चाटे (न्यू हनुमाननगर, गारखेडा परिसर) यांचा समावेश आहे, तर राहुल ऊर्फ राणा बाजीराव सोळुंके (रा. घाटी, बेगमपुरा परिसर) हा अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातातून निसटला.
माजी नगरसेविकेचा मुलगा विशाल गायके यास मारण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे तरुण आलेले असल्याची माहिती पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. आणखी एकास अटक पोलिसांनी रात्री मनोज बळीराम जाधव (३०) याला सिडको, एन-३ भागातून अटक केली. जालना येथील बीएसएनएल कार्यालयातील कर्मचारी सुजाता नरवडे यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागण्यासाठी त्यांच्या कारचा पाठलाग करत सेव्हन हिल उड्डाणपुलावर अडविले व कारच्या काचा फोडून धमकावले. या प्रकरणात मनोज जाधव हा पोलिसांना हवा होता.