- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील ‘लक्ष्मी दर्शन’च्या रकमेत एजंटसह यंत्रणेतील चौघांचा वाटा आहे. लाखो रुपयांची ही रक्कम महिन्याकाठी प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी यंत्रणेचे ‘सारथी’ पार पाडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नव्या वाहनांच्या पासिंगसाठी आरटीओ कार्यालयात सुरूअसलेला खाबूगिरीचा प्रकार ‘लोकमत’ने ‘पासिंगसाठी ३६० रुपयांचे लक्ष्मी दर्शन’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्त प्रकाशित होताच आरटीओतील खाबूगिरीने आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
‘लक्ष्मी दर्शन’साठी सुरू असलेल्या साखळीची माहितीही काहींनी ‘लोकमत’ला दिली. यासाठी वाहनमालक आणि शोरुमचालकांना भुर्दंड बसत असल्याने हा प्रकार कायमचा रोखण्यासाठी उपाययोजना होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आॅनलाईन प्रणालीमुळे फायलींची प्रक्रिया कायमची संपुष्टात येणे शक्य आहे, तशी सुविधाही या प्रणालीत आहे; परंतु कार्यालयातील कामकाज आॅनलाईन होऊनही फायलींचा खेळ केवळ ‘लक्ष्मी दर्शन’साठीच सुरू ठेवण्यात आला. आजघडीला दुचाकी वाहनांच्या पासिंगपोटी प्रत्येक फाईलमागे ३६० रुपये देण्याची नामुष्की शहरातील अनेक शोरुमचालकांवर येत आहे.
यामध्ये काही शोरुमचालकांना तर वाहनांच्या पासिंगसाठी ७८० रुपये देण्याची वेळ येत असल्याचे नव्या सूत्रांकडून माहिती मिळाली. स्वत:च्या खिशातून देणे अशक्य असल्याने ही रक्कम थेट ग्राहकांकडून काढण्यासाठी अनेकांना वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात. यामध्ये ‘फाईल हॅण्डलिंग’च्या नावाखाली रक्कम काढली जात असल्याचे सांगण्यात आले. आरटीओ कार्यालयातून वाहन पासिंग करून घेण्यासाठी ही रक्कम द्यावीच लागते, असे ग्राहकांना सांगितले जाते. त्यामुळे ग्राहकही काहीही न बोलता ही रक्कम देऊन मोकळे होतात.
अशी होते वाटणी‘लक्ष्मी दर्शन’च्या ३६० रुपयांमध्ये प्रत्येकी १०० रुपयांचे दोन वाटे, ५० रुपयांचा एक असे तीन वाटे यंत्रणेचे आणि उर्वरित वाटा एजंटचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोठ्या रकमेचा वाटाही अशाच पद्धतीने होतो. या सगळ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यंत्रणेकडून चांगलीच ‘दमछाक’ केली जाते. त्यामुळे यंत्रणेच्या साखळीत सहभागी होण्याशिवाय पर्याय उरत नाही.