पिशोर (औरंगाबाद ) : सात वर्षांपूर्वी शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात खातखेडा ता. कन्नड येथील चार जणांना कन्नड न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.आर.ठाकूर यांनी सहा महिने सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम ५०६ मध्ये पाचशे रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
याबाबत सपोनि जगदीश पवार यांनी सांगितले की, २०१२ मध्ये खातखेड शिवारात फिर्यादी शामराव भीमराव पवार आणि भीमराव विनायक पवार, अनिल भीमराव पवार, अर्जुन भीमराव पवार आणि उद्धव भीमराव पवार आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्यात शेतीच्या वादातून हाणामारी झाली होती. या मध्ये पिशोर पोलीस ठाण्यात कलम १४३,१४७,१४८,१४९, ५०४, ५०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास खांडेकर यांनी तपास करून कन्नड न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.आर. ठाकूर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी भीमराव पवार, उद्धव पवार, अर्जुन पवार तसेच अनिल पवार यांना कलम ३२३ मध्ये सहा महिने सक्त मजुरी तसेच १००० रुपये दंड आणि कलम ५०६ मध्ये ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. शासकीय अभियोक्ता म्हणून आर.पी. कुर्लेकर यांनी काम पाहिले तर जमादार आर.एस.आमटे व पो.कॉ. सुशील सुरवाडे यांनी कोर्ट पैरवी केली.