लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील कुकडेश्वर महादेव मंदिराच्या मालकीच्या जनावर चोरी प्रकरणी आन्वा पाडा ग्राम पंचायतीचे सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व चिखली येथील व्यापाऱ्यांसह चार जणांचा आरोपीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आठवर गेली आहे. वाकडी कुकडी येथील महादेव संस्थानच्या १५ गायी होत्या. ही संख्या ४० ते ५० पर्यंत संख्या वाढली होती. या जनावरांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून आन्वा पाडा येथील सरपंच व तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी गावात ग्रामसभा घेऊन या गायी व जनावरे पकडून घेऊन जावे यासाठी ठराव घेतला. त्यानंतर या गायी व जनावरे पकडून घेऊन जाण्यासाठी चिखली येथील व्यापारी ईस्माईलखॉ नुरखॉ पठाण रा़शेलसुर, ता़ चिखली याला शंभर रूपयांच्या बाँडवर करार करून दिला. या व्यापाऱ्याने शिवना येथील जनावरे पकडणाऱ्या व्यक्तींना घोडे देऊन ६ मे रोजी वाकडी शिवारात जनावरे पकडायला सुरूवात केली. मात्र गावकरी व संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव चिंचपुरे, लक्ष्मण पाडळे, खंडु जाधव यांनी जनावरे पकडणाऱ्यांना पकडून पोलिांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पाच जनावरे शिवना शिवारामध्ये बांधून ठेवली होती. त्या पैकी दोन जनावरांचा मृत्यू झाला होता तर एक पळून गेले होते. यानंतर दोन जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली होती. त्यापैकी काही जनावरे दगावल्याची माहिती आहे.
सरपंच, तंटामुक्त अध्यक्षांसह चार जणांचा आरोपीत समावेश
By admin | Published: May 12, 2017 12:27 AM