कन्नड/हतनूर : तालुक्यातील अंतापूर येथे शुक्रवारी सायंकाळी उसाच्या फडात बिबट्याची मादी व चार पिले आढळून आल्याने खळबळ उडाली असून या भागात दहशत पसरली आहे.अंतापूर येथील नितीन गुलाबराव बोडखे यांच्या बोरगाव शिवारातील गट क्रमांक ६९ मध्ये उसतोड सुरू आहे. उसतोडीच्या आवाजामुळे मादी बिबट्याच्या पिलांना सोडून बाजूला निघून गेली. मात्र पिलांचा आवाज आल्याने घाबरलेल्या कामगारांनी ही माहिती शेत मालकाला दिली. शेत मालकाने वनमजूर भाऊलाल जाधव यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. भाऊलाल जाधव यांनी गावातील मुक्तानंद बोडखे, सर्वेश्वर बोडखे, सुनील बोडखे, हर्षल बोडखे यांच्यासह शेत गाठून उसाच्या फडात पाहणी केली असता त्यांना बिबट्याचे चार पिले आढळून आली. मात्र, तेथे मादी आढळून आली नाही. त्यांनी पिले हातात घेऊन बघितले तथापि पिलांना कुणीतरी हात लावला याची जाणीव मादीला झाल्याने तिने जोरदार डरकाळी फोडली. त्यानंतर ही गोष्ट भाऊलाल जाधव यांनी वनमंडळ अधिकारी प्रवीण कोळी यांना कळविली. पिलांना हलविल्यास मादी हल्ला करील त्यामुळे ती पिले त्याचठिकाणी ठेवून बाजूला निघून जाण्याची सूचना दिल्यानंतर भाऊलाल जाधव यांनी आदेशाचे पालन करीत पिले तिथेच ठेवून निघून गेले. थोड्याच वेळात मादीने ती पिले सुरक्षित स्थळी हलविली. थोड्याच वेळात वन परिमंडळ अधिकारी प्रवीण कोळी, जी.एन. घुगे, नारायण ताठे, सोनवणे, वनमजूर भिला राठोड , कळांत्रे हे घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना पिले अथवा मादी आढळून आली नाही. पण मादीने पिले सुरक्षित ठिकाणी नेली असावी, असे कोळी यांनी सांगीतले.दोन दिवसांपूर्वी वासराचा पाडला होता फडशादोन दिवसांपूर्वी हतनूर येथील विजयाबाई निवृत्ती शहरवाले यांच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला होता. शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पाच्या परिसरातील ऊस पट्ट्यात बिबट्याचा दिवसेंदिवस वावर वाढत असल्याने शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उसाच्या फडात सापडली बिबट्याची चार पिले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:47 PM