हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्काअभावी तक्रारदार व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. संवादाच्या प्रमुख साधनाच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने पोलिसांच्या सेवेवर परिणाम होत आहे. कायदा आणि सुव्यस्थेमुळे सामाजिक शांतता टिकून आहे. पूर्वीपेक्षा गावातील तंटे, भांडणे आदी घटना संपर्कामुळे टळू लागल्या आहेत. एखाद्या गावातील किंवा निर्जनस्थळी झालेल्या घटना प्रत्यक्ष ठाण्यात येऊन सांगणे शक्य होत नाही. दूरध्वनी हे पोलिस आणि नागरिकांतील संवादाचे प्रमुख साधन आहे; परंतु या साधनाची सुलभता वाटण्याऐवजी ग्रामीण पोलिसांना कटकट वाटत आहे. म्हणून की काय मागील अनेक महिन्यांपासून ग्रामीण ठाण्यातील लॅन्डलाईन दूरध्वनी बंद आहेत. सध्या नर्सी, कुरूंदा, औंढा व वसमत ग्रामीण ठाण्याची दूरध्वनी सेवा बंद अवस्थेत आहे. त्याच्या दुरूस्तीकडे वरिष्ठांनी साफ दुर्लक्ष केले आहे. अनेक अधिकारी नव्याने जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांकही अनेक गावातील लोकांना माहिती झालेले नाहीत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील लोकांची पायपीट वाढली आहे. किरकोळ माहितीसाठी दिवसभराचे काम सोडून संबंधित ठाणे गाठावे लागत आहे. शिवाय ठाण्यातील कर्मचारी त्यांचे मोबाईल उचलत नाहीत. यासंदर्भात कुरूंदा ठाण्याचे पोनि नानासाहेब नागदरे यांना विचारले असता, बिल थकित असल्याने दूरध्वनी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. इतर ठिकाणची सेवाही याच कारणाने बंद आहे. (प्रतिनिधी)
चार पोलिस ठाण्यांचे दूरध्वनी बंद
By admin | Published: September 09, 2014 11:54 PM