उस्मानाबाद : अख्खा जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला असताना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला. उशिराने झालेल्या पावसामुळे उडीद आणि मूग या नगदी पिकांच्या पेरणीची वेळ निघून गेली होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला. परंतु, अनेक नामांकित कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी दर्जाहीन बियाणे मारले. पेरणी करूनही बियाण्याची उगवण झाली नसल्याने आता कृषी विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. आजवर तब्बल १ हजार ५०० वर तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार चार हजार एकरावरील बियाणे आणि खतही मातीत गेले आहे. नुकसानग्रस्त शेकऱ्यांना पेरणीसाठी नव्याने बियाणे देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, ही घोषणाही हवेतच विरली आहे.जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यातच पेरणीची सर्व तयारी पूर्ण केली होती. सोयाबीन बियाण्याचा तुटवडा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतही मिळेल थेथून खरेदी करून ठेवले होते. परंतु, अख्खा जून महिना पावसाच्या प्रतिक्षेत गेला. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. असे असतानाच जुलैै महिन्याच्या पहिल्या आडवड्यात सलगत तीन-चार दिवस सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडला. पडलेला हा पाऊस पेरणीयोग्य असल्यामुळे शेतकऱ्यांनीही तातडीने चाढ्यावर मूठ धरली. परंतु, यावेळी उडीद आणि मूग या पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांऐवजी सोयाबीनवर भर दिला. त्यामुळे सोयाबीनखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, पेरणी करून पाच ते आठ दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बियाण्याची उगवण झाली नाही. सुरूवातीला अशा स्वरूपाच्या काही तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर तक्रारींचा लोेंढा वाढतच गेला. मागील दहा ते पंधरा दिवसांमध्ये कृषी विभागाकडे पन्नास-शंभर नव्हे, तर तब्बल दीड हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थापन केलेल्या पथकार्मत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी अधिकच्या संकटात सापडले आहेत. दरम्यान, तक्रारींचा ओघ अद्याप थांबलेला नसून तो सुरूच असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)शे त क ऱ्यां व र दु बा र पे र णी चे सं क ट !काक्रंबा : जुलैच्या सुरूवातील पेरणीयोग्य पाऊस झाल्याने काक्रंबा व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या लगबगीने पेरणी उरकली. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखलेल्या सोयाबीनच्या पेरणीवर भर दिला. मात्र, शेतकऱ्यांना सोयाबीननेही हुलकावणी दिली आहे. नामांकित कंपन्यांनी दर्जाहीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे. त्यामुळे पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. त्यामुळे खत आणि बियाणेही मातीत गेले आहे. प्रकारामुळे शेतकरी अधिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कंपन्यांकडून पेरणीसाठी बियाणे देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, तेही मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.सोयाबीनचे पंचनामेतामलवाडी : पेरणी करुनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे काम तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव शिवारात कृषी कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे. सुरतगावात सोयाबीनच्या १५ बॅगमधील बियाणांची उगवण झालेली नाही. मंगळवारी तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव, मंडळ अधिकारी आर.बी. जाधव, कृषी पर्यवेक्षक दयानंद वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन बियाणाची उगवण न झालेल्या शेतजमिनीची शेतावर जाऊन पाहणी केली व कृषी सेवक एच.एस. गवळी, उपसरपंच तानाजी गुंड, माजी उपसरपंच राम गुंड यांनी शेतकऱ्यांसमक्ष पंचनामे करुन घेतले. सुरतगावात महाबीज १०, कृषीधन ५ बॅग सोयाबीन उगवले नाही हे स्पष्ट झाले आहे. तरी सोयाबीन उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.२८४ गावेजिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी व कळंब भूम या तालुक्यातील २८४ गावातून १ हजार ५१३ शेतकऱ्यांनी सोयाबीन उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातील ९४ गावे, तुळजापूर २६ गावे, उमरगा २५, लोहारा ५ गावे,भूम मधील १० गावे, वाशी ५४ तर कळंब येथील ७० गावांचा समावेश आहे. ३८८४ एकर क्षेत्रजिल्ह्यातील ३ हजार ८८४ ऐकरवर सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांना या क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. कृषी विभागाने स्थापन केलेल्या पथकाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. परंतु, पंचनामे अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. दरम्यान, तक्रारींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चौकशी समितीउपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, पंचायत समिती कृषी अधिकारी आदी अधिकाऱ्यांची मिळून चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून तक्रारीच्या अनुषंगाने सोयाबीन बियाणाची पेरणी किती खोलवर केली, पेरणी बैैलांच्या माध्यमातून की टॅक्टरच्या सहाय्याने केली आदी बाबी तपासल्या जात आहेत. दरम्यान, सर्व तपाणी पूर्ण झाल्यानंतरच बियाणे का उगवले नाही, याचा निष्कर्ष काढण्यात येईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.३९३० बॅगसोयाबीन उगवले नसल्याबाबत दीड हजारावर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार या शेतकऱ्यांनी जवळपास ३ हजार ९३० बॅग बियाणे पेरले होते. त्यामुळे आजघडीला उस्मानाबाद तालुक्यातील १ हजार ४९४, तुळजापूर १७७, उमरगा १५४, लोहारा ३८, वाशी २००, कळंब १ हजार ८२३, भूम ४६ बॅगचा समावेश आहे.
चार हजार एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही !
By admin | Published: July 30, 2014 12:30 AM