लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रयोगशाळा तंत्रज्ञाची रजा मंजूर करण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या येथील हिवताप विभागाच्या कार्यालयीन अधीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कारवाई केली. लाच स्वीकारणाऱ्या अधीक्षकाचे नाव किरण लक्ष्मीकांत सिंदखेडकर असे आहे.या प्रकरणातील तक्रारदार आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. अर्जित रजेसाठी तक्रारदाराने जिल्हा हिवताप कार्यालयात अर्ज केला होता. येथील कार्यालयीन अधीक्षक किरण सिंदखेडकर यांनी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडून तात्काळ रजा मंजूर करून देण्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञास पाच हजारांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ए.सी.बी.) तक्रार केली. ए,सी.बी.ने शनिवारी हिवताप कार्यालयात जाऊन लाचेच्या मागणीची पंचासमक्ष पडताळणी केली. त्यानुसार सोमवारी दुपारी हिवताप कार्यालयात सापळा लावून किरण सिंदखेडकर यांना चार हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, नंदू शेंडिवाले, धायडे, महेंद्र सोनवणे, आगलावे, गंभीर पाटील, लव्हारे, चव्हाण, कुदर, खंदारे यांनी ही कारवाई केली.
रजा मंजुरीसाठी घेतली चार हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:03 AM