औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट-४ च्या परीक्षेत पात्र उमेदवारांकडून संशोधन आराखडे मागविण्यात आले आहेत. विविध विद्याशाखांमधून तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडे सादर केले. मात्र सर्व विषयांमध्ये मिळून केवळ ८६६ जागा उपलब्ध आहेत. यामुळे अनेकांना संशोधन करण्याची संधी मिळणे दुरापास्त झाले आहे.
विद्यापीठाने जून २०१६ मध्ये पीएच. डी. प्रवेश परीक्षेसाठी (पेट) अर्ज मागविले होते. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रक्रिया सुरूच आहे. विद्यार्थी संशोधनासाठी कन्फर्मेशन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह अनुभव, सेट-नेट आणि एम. फिल. याद्वारे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून संशोधन आराखडा मागविला होता. मुदतीपर्यंत चार विद्याशाखेंतर्गत तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडा दाखल केला आहे. या संशोधन आराखड्याची छाननी ५ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. तर ६ व ७ फेब्रुवारी रोजी पात्र, अपात्र संशोधन आराखड्यांच्या याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होतील, असे विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.
या संशोधन आराखड्याचे सादरीकरण २० ते २४ फेब्रुवारीदरम्यान ठेवण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यास उपलब्ध जागा आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना संशोधनासाठीचे कन्फर्मेशन १५ मार्चपर्यंत देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. तसेच ज्या पात्र प्राध्यापकांना गाईडशिप अद्याप मिळालेली नाही, त्यांना तात्काळ गाईडशिप देण्याची प्रक्रियाही राबविण्यात येणार असल्याचेही डॉ. सरवदे यांनी स्पष्ट केले.
विद्याशाखा उपलब्ध जागा विद्यार्थीविज्ञान व तंत्रज्ञान ५७२ १३७५सामाजिकशास्त्रे १५५ १४०९वाणिज्य व व्यवस्थापन ९७ ३३४आंतरविद्याशाखा ४२ ८१२एकूण ८६६ ३९३०