औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्ण तपासणीचे प्रमाण यंदा चांगलेच वाढले आहे. गेल्या मार्च महिन्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल १० लाख ८२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. गतवर्षीच्या मार्चच्या तुलनेत ही संख्या अडीच लाखांनी जास्त आहे. जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सध्या रोज सरासरी ४ हजार रुग्णांची तपासणी होते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेची ५० प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि २७९ उपकेंद्रे आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्व सुविधा असल्या तरी डॉक्टरच हजर नसतात. त्यामुळे अशा ठिकाणी रुग्ण तपासणीचे प्रमाण अत्यल्प असते. मात्र, गेल्या वर्षीपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या उपस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी अचानक आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी करतात. या कारवायांमुळे आता बहुसंख्य डॉक्टर आरोग्य केंद्रात नियमितपणे उपस्थित असतात. त्याचा परिणाम म्हणून बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८ लाख २७ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यंदा ही संख्या १० लाख ८२ हजारांवर गेली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सध्या रोज सरासरी ४०२५ रुग्णांची तपासणी होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रोज ४ हजार रुग्णांची तपासणी
By admin | Published: May 16, 2014 12:26 AM