स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. करदात्या शेतकऱ्यांकडून हे पैसे आता परत वसूल केले जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी यासंदर्भात आलेल्या नोटिशीला ठेंगा दाखवला आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांनी रक्कम परत करणे पसंत केले आहे.
जिल्ह्यातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी- तीन लाख ८९ हजार
एकूण करदाते शेतकरी- आठ हजार ६८७
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी- चार हजार ८१९
परत केलेली रक्कम- चार कोटी ६४ लाख
वसुलीची टक्केवारी- ६१.७०
करदात्या शेतकऱ्यांनी स्वीकारलेला निधी- सात कोटी ५२ लाख सहा हजार रुपये
अपात्र शेतकरी- ४२०४
४२३ शेतकऱ्यांकडून पैसे वसूल
....................................................
खूप शेतकरी पेन्शनपासून वंचित..
पंतप्रधान किसान पेन्शन योजना ही ऑनलाइन आहे. खेड्यापाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या पेन्शनपासून वंचित राहिले आहेत. खरे तर यासंदर्भात सर्वेक्षण व्हायला हवे होते. यंत्रणा तलाठी आणि ग्रामसेवकांवर अवलंबून राहिली. दुसरीकडे हे तलाठी आणि ग्रामसेवक गावात अभावानेच सापडतात. त्यामुळे खरे गरजू या पेन्शनपासून वंचित राहिले आहेत.
..................................
सातबाऱ्यावर बोजा नको म्हणून पैसे परत....
सातबाऱ्यावर बोजा नको म्हणून करदाते शेतकरी पैसे परत करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. ज्यांच्या नावावर काही हप्ते जमा करण्यात आले, ते जर करदाते असतील तर त्यांच्याकडून या हप्त्यांची वसुली सुरू झाली आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक असल्यामुळे कोण करदाता आहे हे कळणे आता अवघड राहिलेले नाही. करदात्या शेतकऱ्यांनी जमा केलेली रक्कम परत केली नाही तर तो बोजा सातबाऱ्यावर टाकला जातो व त्या करदात्याला बँकेचे कर्ज घेण्यास अपात्र ठरवले जाते.
..................................
काही हप्ते जमा झाले होते; पण ते परत केले
पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचे काही हप्ते माझ्या खात्यावर जमा झाले होते. परंतु मी करदाता असल्यामुळे ते परत करावेत, अशी नोटीस मला आल्यानंतर मी ती रक्कम परत करून टाकली.
राजू मुळे, शेतकर, मंगरूळ
...........................
टॅक्स भरतो म्हणून पैसे परत केले
माझ्या नावावर पाच एकर शेती आहे. परंतु टॅक्स भरते असे लक्षात आल्यानंतर मला नोटीस आली आणि जमा झालेले हप्ते मी परत करून टाकले.
शोभा रंगनाथ सोळुंके, करमाड
.............