बीड : जिल्ह्यातील चार ठिकाणी पहिल्यांदाच नगर पंचायत निवडणुका होत आहेत. याचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. दिवाळीपूर्वीच नगरपंचायत निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत.जिल्ह्यातील आष्टी, शिरूर कासार, पाटोदा, वडवणी या ठिकाणच्या नगरपंचायत निवडणुका पहिल्यांदाच होत आहेत. नगरपंचायतीचा दर्जा दिल्यानंतर सहा महिन्यांत निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यानुसार येथील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अजून जाहीर झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरून नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी इच्छूक असलेल्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी १ ते ८ आॅक्टोबर दरम्यानचा कालावधी आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख ८ आॅक्टोबर आहे. छानणी व उमेदवारांची यादी ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र १९ आॅक्टोबरपर्यंत मागे घेता येणार आहेत. १९ आॅक्टोबरनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रांची यादी २६ आॅक्टोबरला प्रसिध्द करण्यात येईल व १ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान तर २ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक विभागाच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. या निवडणुकांकडे जिल्ह्याच्या नजरा आहेत. (प्रतिनिधी)
चार ठिकाणच्या नगर पंचायत निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच
By admin | Published: October 29, 2015 12:08 AM