फुलंब्री : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज १२ वाजेपासून तालुक्यात तीन ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, चार गावच्या सरपंचांनी राजीनामे देत आरक्षणाची मागणी केली आहे.
मनोज जरांगे यांनी आजपासून मराठा आरक्षणसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ फुलंब्री तालुक्यातील मराठा समाज एकवटला आहे. फुलंब्रीसह आळंद ,गणोरी,बाबरा ,पिंपळगाव वळण अशा पाच ठिकाणी आज दुपारी १२ वाजेपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात शेकडो आंदोलक सहभागी झाले आहेत. यास मुस्लीम, धनगर, मातंग समाजाने देखील पाठिंबा दर्शविला. दरम्यान, उपोषणात काही राजकीय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, त्यांना आता आरक्षण मिळेपर्यंत पुन्हा पक्षीय कार्यक्रमात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
चार गावच्या सरपंचांचा राजीनामामराठा आरक्षणाला पाठींबा म्हणून पेंडगाव येथील सरपंच सोनाली बाबुराव डकले,सोसायटी अध्यक्ष बाबुराव डकले, तसेच बोरगाव आर्ज येथील सरपंच शिवाजी खरातसह संपूर्ण सदस्य, धानोरा येथील सरपंच गणेश गुरुवाड यांच्यासह सर्व सदस्य आणि नायगव्हाण येथील सरपंच जगन दाढे यांनी राजीनामा दिला आहे.---------