औरंगाबाद : गुटख्याच्या गोदामांवर पोलिसांनी छापा मारुन सुमारे चार लाखांचा माल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास जाफरगेट आणि मोंढा भागात करण्यात आली. नदीम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरात गुटखा विक्री जोमाने सुरू असून, तीन ते चार दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पानटपरींची तपासणी करीत होते. शहरात दाखल होणाऱ्या गुटख्यांच्या वाहनांवर पोलीस अथवा अन्न व औषध प्रशासनाने अद्याप थेट कारवाई केलेली नाही. गुटख्याची गोदामातूनच चोरटी विक्री होत आहे. दरम्यान,परिमंडळ दोनचे नवनियुक्त उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक वामन बेले, जिन्सी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते, उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार संपत राठोड, गणेश नागरे, विजय तेलुरे, धनंजय पाडळकर यांच्या पथकाने सायंकाळी जाफरगेट पेट्रोल पंपासमोरील एका तेल भांडारशेजारी असलेल्या शटरमध्ये गुटख्याचे पोते दडवून ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी छापा मारुन गोदामासह मोंढा भागातील राज पान मसाला या दुकानावर छापा मारला. या दुकानातून देखील सुगंधी पान मसाला, गुटखा जप्त करण्यात आला. सुमारे चार लाखांचा माल असल्याची शक्यता प्रथमदर्शनी पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अन्न व औषधी प्रशासनाला पाचारणचार वर्षांपूर्वी मोंढा भागातील दोन गोदामांवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा मारुन सुमारे १४ लाखांचा गुटखा जप्त केला होता. यानंतर मंगळवारी सायंकाळी याच भागातील दुकानावर छापा मारण्यात आला. पोलिसांनी छापा मारुन दोन वाहनांमधून हा गुटखा जिन्सी पोलिस ठाण्यात नेला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुटख्याच्या किंमतीचे मोजमाप सुरू होते.कॅप्शन... जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाफरगेट मोंढा येथे गुटख्याच्या गोदामावर छापा मारून लाखोचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले