टेंभापुरी ते धामोरी या तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. केवळ टेंभापुरी गावात सरकारी गायरान गट क्र. एकवर एका नागरिकाने अनधिकृत भिंत बांधून अतिक्रमण केल्याने दीडशे फुटांचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. पावसाळ्यात याठिकाणी चालणे देखील मुश्किल होते. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ढोले यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.
चौकट
यापूर्वी तीन वेळा आदेशाला केराची टोपली
या अतिक्रमणाविरोधात नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत गंगापूर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीस ६ नोव्हेंबर २०२० रोजी अतिक्रमण काढण्याचे पत्र दिले होते. त्यानंतर १० मे २०२१ रोजी स्मरणपत्र पाठवून चार महिन्यांत हा रस्ता का मोकळा झाला नाही? अशी विचारणा करून पुन्हा आदेश दिले. तरीही दखल न घेतल्याने २१ जून रोजी पुन्हा गटविकास अधिकाऱ्यांनी सक्त ताकीद देऊन तिसऱ्यांदा अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. मात्र ग्रामपंचायतीने या तीनही आदेशांना केराची टोपली दाखविली आहे. शेवटी ढोले आंदोलनाला बसल्यानंतर पुन्हा चौथ्यांदा दहा दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आदेश बजावले आहेत.