सिल्लोड : तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्यांने अतिवृष्टी व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने हताश होऊन मंगळवारी खेळणा नदीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाचा हा चौथा बळी ठरला. गजानन विनायक जोशी ( 35 वर्ष रा.दहिगाव ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
जोशी हे अल्पभूधारक शेतकरी होते.अतिवृष्टी मुळे खरिपातील पीक वाया गेल्याने ते तणावात होते. दररोज पाऊस पडत आहे शेतातील पीक जवळपास नष्ट झाले आहे.आता कर्ज कसे फेडावे.रब्बी पेरणी साठी पैसे कुठून आणावे याची चिंता त्यांना होती. मी हताश झालो आहे. व आता आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही असे जोशी अनेक जणांजवळ बोलत होते. अनेकांनी त्यांची मनधरणी केली. शासनावर विश्वास ठेवा सर्व काही बरे होईल. शासन नक्की मदत करेल अशी समजूत अनेकांनी काढली. मात्र त्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपविली असे नातेवाईकांनी सांगितले.
तीन दिवसांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील ओल्या दुष्काळा ला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काल याच गावातील एका शेतकऱ्याला शेतातील नुकसान पाहून ह्रदय विकाराचा झटका आला. सारोळा येथे पुराच्या पाण्यात बुडून एका मुलीचा मृत्यू झाला. तर आज दहिगाव येथील गजानन जोशी या शेतकऱ्यांने नदीत उडी घेवून आत्महत्या केली.
सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी मुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने लवकर मदत केली नाही व शेतकऱ्यांना धीर दिला नाही.त्यांचे समाज प्रबोधन केले नाही तर हा आकडा वाढू शकतो. तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज निर्माण झाली आहे.