औरंगाबाद : अनिवासी भारतीय जयेश शहा यांना ८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शनिवारी रात्री दाखल गुन्ह्यात उद्योजक सोमनाथ साखरे यांच्यासह बँक आॅफ इंडियाचे अधिकारी गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत. गुन्हे शाखा या सर्वांना चौकशीसाठी बोलाविणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
उद्योजक सोमनाथ साखरे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्याचे कळताच, अनेकांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना फोन करून काय प्रकार आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. झिम्बॉम्बेतील रहिवासी अनिवासी भारतीय जयेश शहा यांनी आरोपी सोमनाथ साखरे यांना २०१३ मध्ये १० कोटी रुपये दिले होते. ही रक्कम परत क रीत असताना साखरे यांच्या सांगण्यावरून जयेश यांनी औरंगाबादेतील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत साडेसात कोटी रुपये मुदतठेव ठेवली होती. त्यानंतर कोणीतरी शहा यांच्या नावे दुसरे खाते याच बँकेत उघडले. बँकेत ठेवलेली मुदत ठेव मोडून यातील २ कोटी रुपये शहा यांच्या परस्पर श्री साई नारायण प्लास्टिक लिमिटेड कंपनीच्या खात्यात वर्ग करण्यात आले, तसेच त्यांच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट खात्यात मुदतीची उर्वरित रक्कम आणि व्याज, असे एकूण ६ कोटी ८० लाख ९४३ रुपये जमा करण्यात आले. नंतर या खात्यातून २ कोटी रुपये एक वर्षासाठी मुदत ठेव ठेवण्यात आली. शिवाय त्यांनी त्यांच्या ठेवीच्या बदल्यात कर्जासाठी अर्ज केला नव्हता, असे असताना ठेवीवर कर्ज घेतल्याचे दाखविण्यात आले.
बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून कुणीतरी त्यांच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट खात्यातून व्यवहार केल्याचे शहा यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले की, तक्रारीनुसार गुन्हा २०१३ मध्ये घडल्याचे दिसून येते. यामुळे तत्कालीन बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे मिळवून त्यांना चौकशीसाठी बोलाविले जाईल. कट रचून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ८ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. यात सोमनाथ साखरे यांची काय भूमिका होती, हे तपासले जात आहे. त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आल्यास अटक केली जाईल.