औरंगाबाद : मॅक्स लाईफ विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याची थाप मारून तीन जणांनी शहरातील एका व्यक्तीला विमा पॉलिसीचा प्रीमियम भरा अन्यथा पॉलिसी बंद पडेल, असे सांगून २ लाख २६ हजार ६९६ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी विमाधारकाने दिलेल्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.पंकज, राहुल शर्मा आणि एका महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, पन्नालालनगरातील रहिवासी विष्णू गोपाळ वझे हे महापालिकेचा निवृत्त उपअभियंता आहे. त्यांनी मॅक्स लाईफ विमा कंपनीकडून २०१४ मध्ये दोन पॉलिसी खरेदी केल्या होत्या. मात्र, काही कारणामुळे २०१७ पासून त्यांना विम्याचे हप्ते भरता आले नव्हते. पंकज नाव सांगणाऱ्या व्यक्तीने ९ मे रोजी त्यांना फोन करून मॅक्स लाईफ विमा कंपनीच्या दिल्लीतील मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. बंद पडलेल्या पॉलिसीचे तुम्ही लगेच हप्ते भरा अन्यथा तुमच्या पॉलिसी बंद होतील. परिणामी तुमचे नऊ ते दहा लाखांचे नुकसान होईल,असे तो म्हणाला. पॉलिसीचे एकत्रित हप्ते भरल्यास तुम्हाला लगेच त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठी तुम्हाला कार्यालयातही येण्याची आवश्यकता नसल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले. त्याने वेळोवेळी कॉल करून एकत्रित प्रीमियम म्हणून २ लाख २६ हजार ६९६ रुपयांचे धनादेश एमएलपी सोल्युशन या नावाने कुरिअरमार्फत पाठविण्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून वझे यांनी कुरिअरद्वारे प्रत्येकी १ लाख १३ हजार रुपयांचे दोन धनादेश आरोपींना पाठविले. हे धनादेश वटल्यानंतर १५ दिवसांनी आरोपींनी पुन्हा वझे यांच्याशी संपर्क साधून तुमच्या पॉलिसीचे आणखी ७ प्रीमियम शिल्लक राहिले असून, त्याचा स्वतंत्र धनादेश पाठविण्याचे सांगितले.कार्यालयात जाऊन केली चौकशीवझे यांनी ही बाब त्यांच्या मित्रांना सांगितली. संशय आल्याने विमा कंपनीच्या स्थानिक कार्यालयात जाऊन तुम्ही दिलेल्या धनादेशातून तुमच्या पॉलिसीचे हप्ते भरले गेले अथवा नाही, याबाबत चौकशी करण्याचा सल्ला मित्रांनी वझे यांना दिला. वझे यांनी विमा कंपनीकडे याविषयी चौकशी केली असता त्यांनी दिलेले धनादेश हे विमा कंपनीत जमा न झाल्याने त्यांच्या पॉलिसीचे हप्ते थकीत असल्याचे सांगितले. तोतया अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच वझे यांनी ५जून रोजी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सानप तपास करीत आहे.
विमा कंपनीचा अधिकारी बोलत असल्याची थाप मारून पॉलिसीधारकाची सव्वादोन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:42 PM