औरंगाबाद: स्वस्त दराने ३०० टन भंगारमाल विक्री करण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील स्क्रॅप व्यापाऱ्याला गुजरातच्या पाच भामट्यांनी १९ लाख ४१ हजार ९५२ रुपयांचा गंडा घातला. व्यापाराने जिन्सी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री तक्रार नोंदविली.
मिश्रा, रहीम, नदीम, रमजान उर्फ रुस्तुम आणि राजा पठाण अशी आरोपींची नावे आहेत. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मजहर खान हारुण खान (रा. सिल्क मिल कॉलनी) हे अरिफ शागिर पटेल यांच्यासोबत भागीदारीमध्ये भंगार खरेदी विक्रीचा धंदा करतात. आझाद चौकात सुप्रीम ट्रेड नावाचे त्यांचे कार्यालय आहे. २५ डिसेंबर २०२० रोजी अझहर खान हे त्यांच्या कार्यालयात बसले असताना रहीम नावाच्या अनोळखी व्यक्तीने त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडे ३०० टन भंगार ३६ रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी असल्याचे सांगितले. ३० डिसेंबर रोजी रहीम सोबत झालेल्या सौद्यात ३० रुपये ४० पैसे प्रति किलो प्रमाणे भंगार खरेदी करण्याचे ठरले. यानंतर रहिमच्या सांगण्याप्रमाणे मिश्रा यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्याने भंगारमाल अनावल (ता. चिखली, वापी, गुजरात) येथे असल्याचे आणि दयालाल मेहता अँड स्टील या नावाच्या बँक खात्यात (सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा मुंबई) पैसे जमा करण्यास सांगितले. यानंतर त्याने नदीमचा मोबाईल क्रमांक देऊन तो तुम्हाला माल दाखवेल असे सांगितले. जुबेर शेख यांनी नदीमसोबत गुजरातला जाऊन मालाची खात्री केली.
७ जानेवारी रोजी तक्रारदार यांनी गुजरातमधून भंगार आणण्यासाठी दोन ट्रक पाठवले. यावेळी मिश्राने त्याच्यासोबत रमजान उर्फ रुस्तुम, राजा पठाण यांना दिले.
चौकट
ई चलन न देता केले मोबाईल बंद
२ ट्रकमध्ये सुमारे ६३ टन ८८० किलो भंगार भरल्यानंतर आरोपींनी तक्रारदार यांच्या व्हाॅट्सॲपवर ७ लाख ५५ हजार ५३६ रुपये आणि ११ लाख ८८ हजार २१० रुपयांची दोन बिले पाठवली. शागीर यांनी लगेच आरटीजीएस करून आरोपीच्या बँक खात्यात १९ लाख ४१ हजार ९५२ रुपये ऑनलाइन वर्ग केले. तक्रारदाराने दोन्ही ट्रकचे ई चलन मागितले असता त्यांनी ई चलन न देता मोबाईल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मझहर यांनी जिन्सी ठाण्यात धाव घेतली. फौजदार विजय जाधव तपास करीत आहेत.