औरंगाबाद : अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून मित्राच्या संस्थेत अडीच कोटी रुपये गुंतवणूक करायला लावून फसवणूक केल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेने ॲड. नितीन रायभान भवर याला अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ११ महिन्यांपासून तो भवर पसार होता.
आरोपी भवरचा मित्र अभिजित विजय पानसरे (रा. नाशिक) याच्या मे कुडोस सायन्स या संस्थेला नासाचे कंत्राट मिळाले आहे. हे कंत्राट पूर्ण करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तुम्ही गुंतवणूक करा आणि अल्पावधीत चांगला परतावा घ्या, असे आमिष दाखवून आरोपी पानसरे, भवर यांनी आर्किटेक शरद किसनराव गवळी आणि त्यांच्या ओळखीच्या २७ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी ९ जानेवारी रोजी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निरीक्षक दीपक लंके, हवालदार प्रकाश काळे, सुनील फेपाळे करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी अभिजित पानसरे याला अटक करण्यात आली होती. तो सध्या हर्सूल कारागृहात आहे. तर त्याची आई आणि बहीण यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिलेला आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी भवर पसार झाला होता. जिल्हा न्यायालय, औरंगाबाद उच्च न्यायालय यांनी त्याला अटकपूर्व जामीन नाकारली होती. यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याला कनिष्ठ न्यायालयासमोर हजर होण्याचे निर्देश दिले होते. भवर पुढे कोणताही पर्याय नसल्याने शुक्रवारी तो न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याला हर्सूल कारागृह येथे पाठविले होते. मंगळवारी पोलिसांनी हर्सूल जेलमधून त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयासमोर हजर केले. गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने विनंती मान्य करून भवरला ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.