शिक्षण : २१ मार्चपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
औरंगाबाद : मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल पालकांच्या पाल्याला प्रवेश दिला जातो. त्यासाठीची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३ ते २१ मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैयस्वाल यांनी केले आहे.
आरटीईसाठी शाळांना नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत ६०३ शाळांनी नोंंदणी केली आहे, तर पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी ३ ते २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. पहिलीसाठी यंदाची प्रवेश क्षमता एकूण तीन हजार ६२१ आहे, तर पूर्व प्राथमिकसाठी दोन शाळा पात्र असून, त्यांची क्षमता चार आहे. ओळखपत्र म्हणून आधार, पॅनकार्ड, गॅस कनेक्शन, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स हा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार असून, पालकांनी घर किरायाने घेतले असल्यास भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या तारखेच्या पूर्वी व त्याचा कालावधी हा एक वर्षाचा असावा. ऑनलाइन अर्ज भरल्यावर लकी ड्रॉ एकाच वेळी आणि ऑनलाइन होणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.