बीड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी मराठी व उर्दू माध्यमात शिकणाऱ्या पहिली ते आठवीतील ३ लाख ९१ हजार ९६६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. जिल्हा परिषद व अनुदानीत मिळून ३ हजार २७० शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप केले होणार आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड लागावी व कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पहिली ते आठवीपर्यंत मोफत पुस्तकांची सोय आहे. त्यानुसार राज्य पाठ्यपुस्तक व निर्मिती मंडळाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. जवळपास ८० टक्के पुस्तके दाखल झाली असून शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व पुस्तके उपलब्ध होतील. गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्याध्यापकांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. त्यानंतर वर्गशिक्षकांच्या माध्यमातून ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत.उन्हाळी सुटीनंतर जून महिन्यातील १५ तारखेपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. सहावीचा नवीन अभ्यासक्रम येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, गतवर्षी काही विद्यार्थ्यांना निम्मीच पुस्तके मिळाली होती तर काही विद्यार्थ्यांना भाषाविषय व गणिताचे पुस्तक मिळालेच नसल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत सर्व पुस्तके पोहचविण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. (प्रतिनिधी)
तीन लाख ९१ हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
By admin | Published: May 21, 2016 11:36 PM