संतोष हिरेमठ, औरंगाबादकोणाला लायसन्स काढायचे आहे... कोणाला वाहनाचा रोड टॅक्स भरायचा आहे...त्यासाठी अर्जाची मागणी केल्यावर थेट ‘झेरॉक्स दुकानांवर जा’ असा सल्ला आरटीओ कार्यालयात वाहनधारकांना दिला जात आहे. प्रत्यक्षात कार्यालयातर्फे विविध मोफत अर्ज उपलब्ध करून दिले जातात. परंतु जाणीवपूर्वक ते वाहनधारकांपर्यंत पोहोचविले जात नाहीत. परिणामी दररोज शेकडो वाहनधारकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.कार्यालयात आलेल्या वाहनधारकांना पहिला अनुभव मिळत आहे तो अर्ज खरेदीचा. आरटीओ कार्यालयातर्फे विविध अर्ज मोफत दिले जातात. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या कक्षात त्याचे वितरण केले जाते; परंतु ही माहिती जाणीवपूर्वक वाहनधारकांपर्यंत पोहोचविली जात नाही. त्यामुळे मोफत अर्ज मिळतो, याची कल्पनाही वाहनधारकांस नसते. मोजके मोफत अर्जच ठेवण्यात येतात. त्यामुळे एखाद्याने अर्ज मागितल्यावर ‘थोड्या वेळाने मिळेल’, ‘आणून देतो’ अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे नाईलाजाने परिसरातील झेरॉक्स दुकान गाठून अर्ज विकत घेण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे. दुपारपर्यंत अवघे ५ अर्ज दिलेअर्ज देणाऱ्या कक्षात बुधवारी लर्निंग लायसन्स, वाहन हस्तांतर, लायसन्स नूतनीकरण, वैद्यकीय प्रमाणपत्र, डुप्लिकेट आरसी केवळ हेच अर्ज उपलब्ध असल्याचे दिसून आले. उर्वरित अर्ज कार्यालयात असून, मागणी केल्यावर तात्काळ दिले जातात, असे येथील कर्मचाऱ्याने सांगितले. दुपारी २ वाजेपर्यंत येथून अवघ्या ५ वाहनधारकांनी अर्ज नेले होते.२० रुपयांपर्यंत झेरॉक्स अर्जकार्यालयाच्या परिसरात असलेल्या झेरॉक्स दुकानांमध्ये २ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत विविध अर्जांची विक्री होत आहे. कार्यालयातील एजंट, प्रतिनिधींना मोफत अर्जाची कल्पना असूनही तेदेखील अर्जांसाठी वाहनधारकांना झेरॉक्स दुकानांवर पाठवितात.हजारो रुपयांचा खर्चअर्ज छापण्यापासून ते कार्यालयात आणण्यापर्यंत हजारो रुपये खर्च करण्यात आले. परंतु वाहनधारकांना त्याचे वितरण होईल, यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न करण्यात येत नाहीत. त्यामुळे मोफत अर्जाविषयी वाहनधारकांना साधी कल्पनाही नाही. छापलेले मोजके अर्ज कक्षात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.