लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मोफत बसपास वाटप केल्या जातात. यावर्षी चालू शैक्षणिक वर्षे २०१७-१८ मध्ये २०६८ मुलींना मोफत बस पासेस हिंगोली आगारातर्फे वाटप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना बस सुविधेचा लाभ मिळत आहे.शालेय - महाविद्यालयीन मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहता यावे, यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर तर आठवी ते बारावी मानव विकास योजनेच्या मोफत प्रवासासाठी बसपास दिल्या जातात. विशेष म्हणजे पूर्वी दर तीन महिन्याला पास नूतनीकरण करून घेणे अनिवार्य होते. परंतु आता यावर्षीपासून मुलींना थेट सहामाही पास वाटप करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासासाठी दरवर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे मोफत बस पासेस दिल्या जातात. गतवर्षी हिंगोली आगारामार्फत ३ हजार ६०० मुलींना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला होता. बसच्या मोफत सुविधेमुळे मुलींना शाळेत ये-जा करणे सोपे झाले आहे. महामंडळाच्या सुविधेमुळे विद्यार्थिनींना लाभ मिळत असून शाळेत पोहोचता येत आहे. शाळांनी यादी आगारप्र्रमुख यांच्याकडे आणून दिल्यानंतर प्रवासासाठी मोफत पास उपलब्ध करून दिल्या जातात. जास्तीत-जास्त मुलींना योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आगाराकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.
२०६८ मुलींना मोफत पास वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:40 AM