:जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरवात
:४ हजार कामगार व त्यांच्या कुटुंबियांना लसीकरण
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात; चार हजार कामगार कुटुंबीयांना लाभ
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज ऑटो कंपनीच्या वतीने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सल्लागार सी.पी. त्रिपाठी, बजाज ऑटोचे उपाध्यक्ष अभय पत्की, उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, विभागीय व्यवस्थापक अनिल मोहिते, व्यवस्थापक सचिन थाले, प्रदीप गुंजाळ, विजय तिवाटणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, लसीकरण मोहिमेसाठी शासनाच्या सोबत उद्योग जगताने पुढाकार घेण्याची गरज आहे. बजाज ऑटोने कामगार व त्यांच्या कुटुंबीयासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला ही प्रशंसनीय बाब आहे. कोरोनामुक्त औरंगाबादसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. डॉ. गोंदावले यांनीही बजाज ऑटोच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
१५ हजार लसीकरण
कंपनीच्या वतीने देशभरात युनिट असलेल्या ठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीत काम करणाऱ्या जवळपास चार हजार कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोफत लस देण्याची व्यवस्था कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून जवळपास १५ हजार लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
फोटो ओळ-
बजाज ऑटो कंपनीतर्फे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सी.पी. त्रिपाठी, अभय पत्की, सुहास कुलकर्णी, अनिल मोहिते, व्यवस्थापक सचिन थाले, प्रदीप गुंजाळ, विजय तिवाटणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले आदी दिसत आहेत.
-------------------------------