औरंगाबाद : अमरनाथ यात्रेत अनेक समाजसेवक यात्रेकरूंसाठी पाणी, अन्नदानाचा उपक्रम राबवितात. महात्मा फुले यांनी आपला पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून दिला होता, अशा थोर महापुरुष तसेच समाजसेवकांच्या कार्याचा आदर्श घेऊन हर्सूल येथील मच्छिंद्र हरणे (पहिलवान) यांनी मोफत पाणी वाटपाचा वसा घेऊन दररोज २० हजार लिटर पाणी वाटप सुरू केले आहे. हर्सूल गावालगत हर्सूल आणि सावंगी तलाव असून, दोन्ही तळ्यांचा फायदा हर्सूल परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे; परंतु गत दहा वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. जनसेवा हीच ईश्वर सेवा असून, आपणसुद्धा काही तरी केले पाहिजे अशा संधीच्या शोधात असलेले मच्छिंद्र पहिलवान यांना मोफत पाणीपुरवठ्याची कल्पना सुचली. शेतातील स्वत:च्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाच हजार लिटरची टाकी बसविली अन् गावात विविध कॉलनी, नगर, चौकात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लगतच्याच धरणात खोदलेल्या विहिरीतून मनपा पाणीपुरवठा करते. नळाला अत्यंत कमी दाबाने पाणी येते. परिणामी, डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी महिला व शाळकरी मुलांची भटकंती होत होती. मात्र, आता ती थांबली असल्याचे समाधान लाभते, असे पहिलवान यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबातील हरणे पहिलवान यांचे बी.ए.चे शिक्षण सुरू असून, दरवर्षी मित्रमंडळीसोबत अमरनाथ यात्रेचा प्रवासही असतो, पाणी वाटपात सर्वांत जास्त समाजसेवा घडते. त्यामुळे चार वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविणे अविरतच सुरूच आहे. पाणी, डिझेल व चालक, अशी दररोजची दिनचर्याच तयार झाली आहे. गावातील देवीचा भंडारा, विवाह व इतर समारंभांना मोफतच पाणी दिले जाते. कुठलेही अनुदान किंवा आर्थिक मदत स्वीकारली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.२० हजार लिटर दररोज पाणीजळगाव टी-पॉइंटजवळ हर्सूलची जलवाहिनी जोडली नसल्याने आजही हर्सूलवासीयांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जलवाहिनी जोडल्यास हर्सूलवासीयांचा प्रश्न निकाली निघेल; परंतु त्याकडे कानाडोळा केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. नागेश पचलोरे, कृष्णा गुंजाळ, मुजीब पटेल, राजू पचलोरे यांनी सांगितले की, पहिलवान यांच्याशी फोनवर संपर्क साधला की गल्लीत पाण्याचे टँकर मिळते. परिणामी, हर्सूलमध्ये टंचाईची झळ जाणवली नाही.
हर्सूल परिसरात मोफत पाणी वाटपाचा वसा
By admin | Published: June 29, 2014 12:55 AM