वाळूज महानगर : भीषण पाणीटंचाईमुळे वडगावात पाणीप्रश्न बिकट बनला आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेवून संघर्ष युवा फाऊंडेशनने पुढाकार घेवून वडगावात टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यावर कोट्यवधीचा निधी खर्च करुनही अद्याप वडगाव कोल्हाटी गावचा पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदा परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे. एमआयडीसीचे पाणी असूनही योग्य नियोजन नसल्याने अर्ध्यापेक्षा अधिक भागात एमआयडीसीचे पाणी मिळत नाही.
गावाला पाणीपुरवठा करणारे हातपंप, विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. तर काही बंद पडले आहेत. ग्रामपंचायतीकडून आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना परिसरातील शेत विहिरीवरुन भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी संघर्ष युवा फाऊंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. फाऊंडेशनचे पवन खरात, मनोज सेनानी, निखिल इंगळे, विशाल पगारे, महेंद्र तायडे, दिनेश ठाकूर, सखाराम लांडगे आदींंनी दिलेल्या लोकवर्गणीतून गावात टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा ...संघर्ष युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पवन खरात यांनी पुढाकार घेवून संजय शाह व अनिल लुनिया यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरु केला आहे.
सावित्रीबाई फुलेनगर, सलामपुरेनगर आदी नागरी वसाहतींत आठवडाभरापासून टँकरने पाणी वाटप केले जात आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच फाऊंडेशनतर्फे जनावरांसाठीही सलामपुरे नगर जवळील दर्गाजवळ जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.