औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी विभागाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने फुकटात पाणी वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल दोन वर्षे पाण्याचा वापर सुरू असताना शांत बसलेले घाटी प्रशासन आता बांधकाम संपल्यानंतर कंत्राटदाराला जाब विचारत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या २२० खाटांच्या स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे कामकाज २०१६ मध्ये सुरूझाले. हे कामकाज डिसेंबर २०१७ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या विभागाच्या इमारतीसाठी घाटी रुग्णालयातील विहिरीतील पाण्याचा वापर करण्यात आला. घाटी रुग्णालयातील विविध विभागात पाणीटंचाईमुळे वेळोवेळी टँकर मागविले जातात. त्यातून आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ घाटी प्रशासनावर येत आहे, असे असताना सुपर स्पेशालिटीच्या कामासाठी कंत्राटदाराला मोफत पाणी पुरविण्यात आल्याचे समोर आले. पाच मजली ही इमारत आता पूर्णपणे उभी राहिली आहे. दोन वर्षांचा वापर पाहता दररोज एक टँकरप्रमाणे किमान ७०० टँकर पाण्याचा वापर झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातून लाखो रुपयांचे पाणी मोफत वापरले गेले; परंतु घाटी प्रशासन कंत्राटदारावर मेहेरबान राहिल्याचे दिसते.
सप्टेंबर २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण झाले पाहिजे. एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी तंबी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी कंत्राटदाराला दिली होती; परंतु ही डेडलाईनही उलटून गेली आहे. तरीही अद्याप काम सुरूच आहे.
‘घाटी’च्याच पाण्याचा वापरइमारतीच्या बांधकामासाठी घाटी रुग्णालयाच्या पाण्याचा वापर करण्याचे निश्चित झाले होते. त्यासंदर्भात पूर्वीच्या अधिष्ठातांबरोबर सामंजस्य करार झाला होता, असे प्रकल्प अधिकारी आणि अभियंत्याकडून सांगण्यात आले.
जोडणी घ्यायला हवी होतीकंत्राटदाराने स्वतंत्र पाण्याची जोडणी घ्यायला हवी होती; परंतु तसे केले नाही. यामुळे काही वेळा पाणीपुरवठादेखील बंद करण्यात आला होता. पाणी वापराच्या बदल्यात जलवाहिनीचे काम करून द्यायचे ठरले होते; परंतु त्यासंदर्भात काही लेखी नाही. हा सगळा प्रकार मी येण्यापूर्वी झालेला आहे. तोपर्यंत इमारत बांधून झालेली होती.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय