औरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेसाठी ७२ कनिष्ठ निवासी डॉक्टर मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लवकरच या रुग्णालयात निवासी डॉक्टर रुजू होऊन रुग्णसेवेत वाढ होण्यास मदत होईल.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत निवासी डॉक्टरांचे मानधन जवळपास ४० ते ५० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे निश्चित केलेले आहे. २०११ मध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी कनिष्ठ निवासी डॉक्टरांची ७२ पदे मंजूर करण्यात आली; परंतु या ठिकाणी नियुक्त करावयाच्या निवासी डॉक्टरांना दरमहा केवळ १४ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले. त्यामुळे एवढ्या वेतनात निवासी डॉक्टर म्हणून रुग्णालयात रुजू व्हायला कोणीही तयार झाले नाही. त्यांचे वेतन योग्य त्या नियमानुसार करण्यासाठी २०१२ पासून रुग्णालय प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. बाह्यरुग्णसेवा, शस्त्रक्रिया, रुग्णांवर देखरेख अशी सगळी जबाबदारी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांना पार पाडावी लागते. कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या मानधनासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (अकॅडमिक) डॉ. कैलास शर्मा, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला. अखेर मंगळवारी विद्यावेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लवकरच या ठिकाणी निवासी डॉक्टरांची पदे भरल्या जातील.
रुग्णसेवेत वाढकनिष्ठ निवासी डॉक्टरांना १४ हजार रुपयांचे वेतन हे चुकीचे होते. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करण्यात आला. अखेर आज निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्करोग रुग्णालयात निवासी डॉक्टर नियुक्त होतील. पदव्युत्तर शिक्षणदेखील ते घेतील. त्यामुळे रुग्णसेवेतही वाढ होईल, असे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (अकॅडमिक) डॉ. कैलास शर्मा म्हणाले.
४८ ते ५२ हजार रुपये वेतनकर्करोग रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वेतनवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केले. अखेर निर्णय घेण्यात आला. ४८ ते ५२ हजार रुपये वेतन केल्यामुळे निवासी डॉक्टर मिळतील. रुग्णसेवेसाठी हे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.