औरंगाबाद: हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील निजाम सरकार आणि रझाकारांच्या विरोधात सशत्र लढ्यात सहभागी असलेले स्वातंत्र्यसैनिक जेष्ठ विधिज्ञ काशीनाथ नावंदर यांचे आज निधन झाले. वयाच्या ९५ वर्षी वृद्धापकाळाने शहरातील पदमपुरा येथील निवास्थानी त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे.
स्वातंत्र्यसैनिक काशीनाथ नावंदर स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांनी भूमिगत राहून औरंगाबाद तहसील कचेरीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. परसोडा आणि रोटेगावचे रेल्वे रूळ त्यांच्या गटाने उखडले होते. तारा तोडून निजाम सरकारची दळणवळण व्यवस्था त्यांनी आपल्या परीनं उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थ उद्यानाजवळचा पूल स्फोटानं उडवून छावणीचा शहराशी संपर्क तोडण्याचेही प्रयत्न त्यांनी केले होते.
काशिनाथ नावंदर यांचा अल्पपरिचय २७-१०-१९२७ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण गंगापूर व नंतरचे औरंगाबाद येथे 'झाले. उस्मानिया विद्यापीठातून ते बी.एस्सी. एलएल. बी. पास झाले. १९५४ पासून औरंगाबाद येथे त्यांनी वकिली व्यवसाय सुरु केला. १९८१ पासून हायकोर्ट प्रॅक्टिस सुरू केली. १९४६ पासून त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली.
हैदराबाद मुक्तिलढ्यात सशस्त्र सहभागमहाराष्ट्र परिषद, समर्थ व्यायामशाळा, गणेश संघ अशा संस्थांमधून त्यांनी राजकीय जागृतीचे कार्य केले. राष्ट्र सेवा दलाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. ४७-४८ च्या हैदराबाद मुक्तिलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या भूमिगत लढ्यासाठी औरंगाबाद शहरात केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले होते. विद्यार्थी आणि तरुणांसाठी लढ्याचे शिक्षण देणारे कॅम्प त्यांनी उभे केले. शाळा, कॉलेज, कोर्ट यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या चळवळी त्यांनी उभ्या केल्या. सरकारी इमारती, रस्ते, पूल उडविणे, पत्रके काढून निज़ामविरोधी वातावरण तयार करण्यात सक्रिय होते. सरकारी यंत्रणा उलथवून टाकण्यासाठी मनमाड या मुख्य सीमोषेवर भूमिगत चळवळी केल्या.
स्वातंत्र्यानंतर राजकारणात सक्रीय स्वातंत्र्य मिळाल्यावरही ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिले. हैदराबाद संस्थान भारतात विलीनीकरणाच्या पोलिस अॅक्शननंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. नंतर प्रजासमाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, जनता पार्टी, जनता दल असा राजकीय प्रवास अनेक पदांवर राहून केला. १९८० साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या विरोधात त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आय काँग्रेसनं अब्दुल अजीम यांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत जनता दल आणि जनसंघातील युतीची बोलणी फिस्कटली. नावंदर यांचा पराभव करून अब्दुल अजीम आमदार झाले. त्यांनी मराठवाड्याच्या अनेक प्रश्नांवर उग्र लढे दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीत अमूल्य योगदान दिले. औरंगाबाद शहरात बाहेरून आलेल्या निराधार लोकांसाठी झोपडी संघाची स्थापना केली. दक्षता समिती, लायन्स क्लब, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ सिनेट या माध्यमातून कार्य केले. लायन्स क्लबद्वारा अनाथ बालकांसाठी बालग्रामाची स्थापना केली. मराठवाडा विकास ब्रॉडगेज रेल्वे यासाठी वेळोवेळी सत्याग्रह केले.
जेष्ठ विधिज्ञ म्हणून महत्वपूर्ण कामजनसंघानं मदत न केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागल्याचा सल अखेरपर्यंत त्यांच्या मनात राहिली. त्यानंतर त्यांनी राजकारणाऐवजी वकिलीतच जम बसवला. बार असोसिएशनचे अध्यक्ष असताना मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला सुरू व्हावं, यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून वृद्धापकाळामुळे ते सामाजिक जीवनात सक्रीय नव्हते. त्यांच्यावर आज बुधवारी सायंकाळी 5 वाजता प्रकाशनगर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मनीष नावंदर यांनी दिली आहे.