औरंगाबाद : महापालिकेने जानेवारी २०१३ मध्ये सुरू केलेल्या मोफत अंत्यविधी योजनेस घरघर लागली आहे. प्रशासनाची अनास्था, वाढता खर्च आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे योजना मरणासन्न अवस्थेत आहे. तातडीने याबाबत निर्णय घेतला नाहीतर योजनेचा ‘अंत’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात पाणीपुरवठा, रस्ते, पथदिव्यांची सेवा देण्यात मागे पडलेल्या पालिकेने मोफत अंत्यविधीची योजना २२ महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. १ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च त्या उपक्रमावर मनपा निधीतून आजवर करण्यात आला आहे. शहरातील ३४ स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात ३ हजार ६२२ अंत्यविधी करण्यात आले. चालू वर्षांत २ हजार ९५३ अंत्यविधी झाले आहेत.प्रत्येक विधीसाठी मनपा २५०० रुपयांचे अनुदान देत आहे. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च स्मशानजोग्यांच्या नावे काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा केला जातो. २ महिन्यांपासून स्मशानजोग्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. १६ लाख रुपयांची ती रक्कम आहे. योजना पालिकेने चालवावी यासाठी मालमत्ता विभागाशी जोडण्यात आली. मात्र, प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत संचिका मंजुरीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.स्मशानजोग्यांनी आज उपमहापौर संजय जोशी यांची भेट घेऊन योजनेला लागलेल्या घरघरीला वाचा फोडली. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकूड, गौऱ्यांच्या पुरवठादारांची रक्कम थकल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर जोशी म्हणाले, दोन दिवसांत याप्रकरणी निर्णय होईल. श्रीमंतांनी तरी दान करावे...मोफत अंत्यविधीची योजना गरिबांसाठी होती. मात्र, श्रीमंत किंवा ज्यांची २ हजार ५०० रुपये देण्याची ऐपत आहे. ते नागरिकदेखील मनपाच्या खात्यावर धनादेश किंवा रोख रक्कम टाकत नाहीत. २२ महिन्यांत १ लाख ४७ हजार रुपये मनपाच्या ५०१००००३४२२७४७ या खात्यावर जमा झाले आहेत. या काळात मनपाने अंत्यसंस्कार सामग्रीवर दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, विद्युत दाहिनीचा वापर केला पाहिजे. तशीच ही योजना मनपाच्या फायद्याची नाही. त्यामुळे याप्रकरणी पुनर्विचार झाला पाहिजे, असे आयुक्तांचे मत असल्याचे उपमहापौर म्हणाले. याप्रकरणी आयुक्तांशी संपर्क झाला नाही. कब्रस्तानांची सुरक्षा अधांतरीशहरात ३२ कब्रस्तान आहेत. त्या कब्रस्तानांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी २ सुरक्षारक्षक नेमण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी मनपाने काहीही निर्णय घेतला नसल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी केला.
महानगरपालिकेच्या मोफत अंत्यविधी योजनेला घरघर
By admin | Published: November 25, 2014 12:48 AM