औरंगाबाद : शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने विदेशात राहणारा आपला मुलगा-मुलगी,नातेवाईक मागील वर्षी कोरोनामुळे फराळापासून वंचित राहिले. त्यांना यंदा घरच्या मायेच्या ओलावा देण्यासाठी खास घरी बनविलेला फराळ पाठविला जात आहे. शहरातून अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आदी देशांत आतापर्यंत १० टन फराळाचे पार्सल कार्गेा विमानातून पाठविले असून, औरंगाबादेतील फराळांचा घमघमाट परदेशात पोहोचला आहे.
औरंगाबादेतून उच्च शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तेथेही आपले सण-उत्सव परंपरा तेवढ्याच जल्लोषात ते साजरा करतात. विदेशात राहणाऱ्या आपल्या मुला-मुलींना, सूनबाई, जावई, नातवंडांना दिवाळीला घरी बनविलेल्या फराळाचे पदार्थ हमखास पाठविण्यात येतात. मागील वर्षी कोरोनामुळे विमानसेवा बंद होती. यामुळे मागील वर्षीची दिवाळी परदेशस्थ औरंगाबादकरांना घरच्या फराळाविना साजरी करावी लागली होती. मात्र, यंदा बंधने उठल्याने शहरवासीयांनी दसऱ्यापासूनच विदेशात फराळ पाठविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली होती. आजपर्यंत शहरातून १० टन फराळ, कपडे कुरिअरने विदेशात पाठविण्यात आले. परिणामी, मागील वर्षीपेक्षा ७५ टक्क्यांनी कुरिअरचा व्यवसाय वाढल्याचे व्यावसायिक कृष्णा ढगे पाटील यांनी नमूद केले.
विदेशात फराळ पोहोचण्यासाठी लागतोय विलंबऔरंगाबादेत ५ कुरिअर कंपनीद्वारे विदेशात फराळ पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. येथून बॉक्समध्ये पॅकबंद केलेला फराळ मुंबईत पाठविला जातो. तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्गेा विमानातून पार्सल विदेशात पाठविले जाते. सध्या विमानाच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. कर्मचारी कमी असल्याने पार्सल क्लिअरन्सला वेळ लागत आहे. त्यामुळे सर्वच देशांत पार्सल विलंबाने पोहोचत आहेत. अमेरिकेत पार्सल पोहोचण्यासाठी १० दिवस लागत आहेत, असे कुरिअर व्यावसायिकांनी सांगितले.
कोणत्या देशात पाठविल्या जातोय फराळअमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड,आयलँड, स्वित्झरलँड आदी देशांत औरंगाबादेतून फराळ पाठविण्यात येतो.
८ ते २० किलोदरम्यान फराळकुरिअर व्यवसायिकांनी सांगितले की, परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना ८ ते २० किलो दरम्यान फराळ पाठविणाऱ्यांची संख्या अधिक आहे.