करमाड : लॉकडाऊन काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वर्षभरापासून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. यानंतर भाजप जिल्हा सरचिटणीस रवीकुमार कुलकर्णी व परिसरातील नागरिकांनी साखळी उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे शुक्रवारी दिला. त्यावर महावितरणने दुरुस्ती करण्याचे आश्वासन शनिवारी दिल्याने उपोषण स्थगित केल्याचे कुलकर्णी यांनी कळविले आहे.
करमाड गावात न्यू हायस्कूल परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, त्रिरत्न नगर, आझाद नगर, गजानन कॉलनी या परिसरात वर्षभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच सध्या रमजानचा पवित्र महिना असल्याने मुस्लिम बांधवांचे रोजे (उपवास) असतात. यासंदर्भात करमाड येथील महावितरण कार्यालयाला साखळी उपोषणाचा इशारा भाजप जिल्हा सरचिटणीस रविकुमार कुलकर्णी व नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत शुक्रवारी उपकार्यकारी अभियंता सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता अरविंद काळे यांनी परिसरात जाऊन समस्या जाणून घेतल्या व नवीन रोहित्र मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच कैलास उकर्डे, उपसरपंच रमेश, ग्रा.प. सदस्य डॉ. जिजा कोरडे, सय्यद कदीर, माजी सरपंच दत्तात्रय उकर्डे, गुड्डू मिर्झा, सुनील तारो, विजय दवंडे, सय्यद फेरोज भाई, शेख आरेफ भाई, संजय जगधने, बाबासाहेब कुलकर्णी, सय्यद हारूण, हारूण मिर्झा बेग, लाईनमन बन्सवाल आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
करमाड येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना महावितरणचे अभियंता शिंदे, काळे, सरपंच कैलास उकर्डे, उपसरपंच, रमेश कुलकर्णी ग्रा.प.सदस्य दत्ता उकर्डे आदी.