छत्रपती संभाजीनगर : पैशांच्या मोहातून मैत्रीमध्येच बेबनाव निर्माण होऊन सहा मित्रांनी मिळून एका मित्राचे दुकान फोडले. त्यातील तब्बल ३ लाख ६२ हजार रुपयांचे साहित्य चोरून लंपास केले. हर्सूल पोलिसांच्या तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर पाच मित्रांना अटक करण्यात आली असून सहावा अल्पवयीन निष्पन्न झाला.
मनोज दत्ता सोळुंके (२१, रा. टी.व्ही. सेंटर), आकाश रघुनाथ सांगळे (२४, रा. एन-११), सतीश रमेश खंडागळे (३०), अक्षय सुरेश वऱ्हाडे (२७, दोघेही रा. मयूरपार्क ), विजय दीपक म्हस्के (३०, रा. उस्मानपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. योगेश अशोक काळे (२७, रा. मयूर पार्क) यांचे डीजेचे सुटे भाग विक्रीचा व्यवसाय असून मयूर पार्क परिसरात शिवमल्हार चौकात दुकान आहे. ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यात साऊंड, कॉईल, माईक, स्पिकर, डायकॉम मशीन असे विविध ३ लाख ६२ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले होते. हर्सूलचे निरीक्षक सुनीता मिसाळ, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी तत्काळ याप्रकरणी तपास सुरू केला.
चोरी करून तक्रारीसाठी ठाण्यातसर्व आरोपी व योगेश हे चांगले मित्र आहेत. मात्र, पैशांच्या इर्षेतून मित्रांनी बनावट चावीने चोरीचा कट रचला. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी योगेश तक्रारीसाठी हर्सूल पोलिस ठाण्यात असताना आकाशही मित्राला आधार देण्यासाठी तेथे उपस्थित होता. यातील अक्षय हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले.