औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपल्या अन् औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी प्रवाशांची एकच गर्दी झाली. शिवनेरी, शिवशाही बसगाड्यांचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली होती. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहून तिकीट घेण्याची, बसच्या प्रतीक्षेत ताटकळण्याची वेळ प्रवाशांवर आली. पुणे गाठताना ऐन हिवाळ्यात घामाघूम होण्याची वेळ प्रवाशांवर ओढवली.
नोकरी, शिक्षणानिमित्त शहरातून पुण्याला वास्तव्यास असलेल्यांची मोठी संख्या आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी हे सर्व शहरात आले होते. दिवाळीच्या सुट्या संपताच अशांनी रविवारी आपापल्या नोकरी, कामाच्या आणि शिक्षणाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पुण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात एकच गर्दी केली. पुण्याला जाणाऱ्या बहुतांश प्रवाशांचे शिवनेरी, शिवशाही बसला प्राधान्य असते. त्यामुळे रविवारी आरामदायक प्रवासासाठी शिवनेरी, शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी सर्वाधिक गर्दी केली होती. अनेक प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट घेतल्याने ते थेट बसमध्ये बसत होते. अनेकांना तिकिटासाठी रांगेत ताटकळावे लागले.
जादा बसेस, तरीही गैरसोयप्रवाशांच्या सुविधेसाठी एस.टी. महामंडळाकडून रविवारी पुणे मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. परंतु जादा बसेस सोडूनही प्रवाशांना पुणे गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. वेळेवर बस न येणे, ऑनलाईन तिकीट असून बसची शोधाशोध करणे, अशा प्रकारांना प्रवाशांना सामोरे जावे लागले.
४ वाजेपर्यंत ६४ बस रवानादुपारी ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकातून नियमित १४ आणि जादा ५० बस पुण्याला रवाना झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांनी दिली. प्रवाशांच्या गर्दीमुळे बसेस वेळेवर जातील, यासाठी अधिकारी बसस्थानकात तळ ठोकून होते.