छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून विमानाने आता जयपूरला अवघ्या ४ तासांत जाणे शक्य होणार आहे. इंडिगोकडून २७ ऑक्टोबरपासून अहमदाबादमार्गे जयपूरसाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यात प्रवाशांना विमान बदलण्याचीही गरज पडणार नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर ही दोन जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे विमानसेवेने जोडली जाणार आहेत.
शहरातून जयपूरसाठी विमान सेवा सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. अखेर इंडिगोने अहमदाबादमार्गे ही विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले, अहमदाबादमार्गे जयपूर-छत्रपती संभाजीनगर विमान सेवा सुरू होत आहे. यात विमान न बदलता अहमदाबाद येथे थोड्यावेळ थांबून जयपूरला जाता येणार आहे.
प्रतिसाद वाढला तर थेट विमान सेवाजयपूरला विमानाने जाणाऱ्या पर्यटकांची, प्रवाशांची संख्या वाढली तर आगामी काळात छत्रपती संभाजीनगरहून थेट विमान सेवा सुरू होऊ शकते. त्यादृष्टीनेही विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत.
उदयपूर विमानसेवेची प्रतीक्षातब्बल २१ वर्षांनंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये एअर इंडियाने छत्रपती संभाजीनगरातून उदयपूरसाठी विमान सेवा सुरू केली होती. परंतु कोरोना काळात ही विमानसेवा बंद पडली. ही विमानसेवा पुन्हा सुरु होण्यासाठी विमानतळ प्राधिकरणासह अनेकांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
असे राहील जयपूर विमानाचे वेळापत्रक- जयपूरहून सकाळी ८:३५ वाजता उड्डाण आणि सकाळी १०:१५ वाजता अहमदाबादला आगमन.- अहमदाबादहून सकाळी ११ वाजता उड्डाण आणि दुपारी १२:४५ वाजता छत्रपती संभाजीनगरला आगमन.- छत्रपती संभाजीनगरहून दुपारी १:२० वाजता उड्डाण आणि दुपारी ३:०५ वाजता अहमदाबादला दाखल.- अहमदाबादहून दुपारी ३:३५ वाजता उड्डाण आणि सायंकाळी ५:१० वाजता जयपूरला दाखल.