औरंगाबाद, दि. 7 : पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना भेटून तक्रार करण्यासाठी आलेल्या एका जणाने आयुक्तांच्या केबिनबाहेरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घडली तेव्हा पोलीस आयुक्त कार्यालयात नव्हते. कर्मचा-यांना हा प्रकार दिसताच त्यांनी त्यास घाटी येथील रुग्णालयात दाखल केले.
शेख हनीफ शेख चुन्नू (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल)असे विष पिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, शेख हनीफ याने गतवर्षी शेख कैसर उर्फ गोटू तसेच इतरांकडून गतवर्षी नोटबंदीच्या कालावधीत उसने पैसे घेतले होते.या रक्कमेतून त्याने प्लॉट खरेदी केलेले आहेत. त्याने खरेदी केलेले प्लॉट विक्रीसाठी काढले मात्र त्यास ग्राहक मिळत नाही. असे असताना त्याला उसने पैसे देणारे लोक त्याच्याकडून पैसे परत मागत आहेत. लोकांकडून पैश्याचा तगदा वाढला.
यातही शेख कैसर उर्फ गोटू याने जास्त प्रमाणात तगदा लावल्याने त्याच्याविरूद्ध तक्रार अर्ज घेऊन हनीफ आज दुपारी किटकनाशक पिऊनच पोलीस आयुक्त कार्यालयात आला होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास तो पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनबाहेरील खुर्चीवर बसला. त्याने सोबत एका बाटलीतहीकीटकनाशक आणले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात नसल्याने तो त्यांची प्रतिक्षा करीत असताना त्याने अचानक सोबत आणलेली कीटकनाशकाची बाटली तोंडाला लावली. काही वेळानंतर त्याने अचानक उलट्या करण्यास सुरवात केली. ही बाब तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली.
यावेळी पोलिसांनी त्यास आत्महत्येचा प्रयत्न का करतो,असे विचारले असता लोकांची देणी जास्त झालेली आहे आणि जवळ एक छदामही नसल्याने त्यांची देणी देता येत नाही. त्यांच्याकडून पैशाचा तगादा वाढल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला. यावेळी त्याचा अर्ज घेऊन पोलिसांनी त्यास तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती तातडीने बेगमपुरा पोलिसांना कळविण्यात आली. बेगमपुरा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतल्याचे सुत्राने सांगितले.